शीख हे हिंदू नाहीत! धर्माच्या स्वतंत्र दर्जासाठी घटनादुरुस्ती करा; जागो संघटनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 06:29 AM2019-11-28T06:29:28+5:302019-11-28T06:30:24+5:30
शीख धर्म हिंदू धर्माचा भाग नाही. अनेक रूढी-परंपरा, प्रतीके भिन्न आहे त्यामुळे शीख धर्माला स्वतंत्र दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी ‘जागो’ धार्मिक संघटनेचे अध्यक्ष मनजीत सिंग जीके यांनी केली आहे.
नवी दिल्ली - शीख धर्म हिंदू धर्माचा भाग नाही. अनेक रूढी-परंपरा, प्रतीके भिन्न आहे त्यामुळे शीख धर्माला स्वतंत्र दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी ‘जागो’ धार्मिक संघटनेचे अध्यक्ष मनजीत सिंग जीके यांनी केली आहे. जीके यांनी २६ जानेवारी २०२० पर्यंत शीख धर्माला स्वतंत्र दर्जा देण्याची विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली आहे.
राज्यघटनेतल्या अनुच्छेत २५- ब मध्ये सुधारणा करावी. याच अनुच्छेदामुळे शीख धर्म हिंदू धर्माचाच भाग असल्याचे मानले जाते. याच अनुच्छेदात सुधारणेची मागणी मनजीत सिंग जीके यांनी केली. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, शीख धर्म हा हिंदू धर्माचाच भाग असल्याचे राज्यघटनेने मानले असले तरी शिखांना कृपाण बाळगण्याचा अधिकार दिला आहे. हा विरोधाभास असल्याचा दावा मनजीत सिंह जीके यांनी केला आहे.
देशात अनेक ठिकाणी कृपाण बाळगण्यास शिखांना विरोध केला जातो. शिखांवर हा अन्याय आहे. कॅनडात आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये प्रवास करणाऱ्या शिखांना कृपाण सोबत ठेवण्याची परवानगी असते. वाघा सीमा, करतारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानात जाणाºया शिखांना कृपाण बाळगता येते. परंतु भारतातून उड्डाण करणाºया आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात आम्हाला कृपाण सोबत ठेवता येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.