शीखांसाठीही भारतमाता की जय म्हणणं वर्ज्य - सिमरनजीतसिंग मान
By admin | Published: March 23, 2016 02:18 PM2016-03-23T14:18:29+5:302016-03-23T14:18:29+5:30
भारतमाता की जय किंवा वंदे मातरम या घोषणा शीखांसाठीही वर्ज्य असल्याचे सांगत कट्टर नेते सिमरनजीत सिंग मान यांनी या वादग्रस्त विषयात नवी भर टाकली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
भटिंडा, दि. 23 - भारतमाता की जय किंवा वंदे मातरम या घोषणा शीखांसाठीही वर्ज्य असल्याचे सांगत कट्टर नेते सिमरनजीत सिंग मान यांनी या वादग्रस्त विषयात नवी भर टाकली आहे. कुठल्याही प्रकारे शीख धर्मात महिलांची पूजा नसल्याचा दाखला मान यांनी दिला आहे. वाहेगुरूजी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह या घोषणा शीखांनी द्यायला हव्यात असे मान म्हणाले.
भारत माता की जय जे म्हणणार नाहीत ते देशद्रोही असल्याचं मत भाजपाच्या काही नेत्यांनी तसेच कट्टर हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केलं. त्यानंतर ओवेसींनी या प्रकरणी घटनेत असं नसल्याचं आणि भारतमाता की जय आम्ही म्हणणार नाही सांगत वाद पेटता ठेवला. जावेद अख्तर यांनी संसदेमध्ये भारतमाता की जय असं त्रिवार म्हणत असं म्हणणं हा माझा अधिकार असल्याचं ठामपणे सांगितले. आणि आता मान यांनी शीखांना वंदे मातरम व भारतमाता की जय म्हणता येणार नाही असं सांगत नवीनच विषय पुढे आणला आहे.
स्वतंत्र खलिस्तानचा पुरस्कार करणारे व माजी आयपीएस अधिकारी असलेल्या मान यांनी भाजपाशासित राज्यांनी अन्य धर्मीयांवर भगवद्गीतेची सक्ती करू नये असंही म्हटलं आहे.