आयोगाने अपात्रता कमी केल्याने सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे पद शाबूत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:46 AM2019-09-30T04:46:21+5:302019-09-30T04:46:35+5:30
भ्रष्टाचाराच्या एका खटल्यात शिक्षा झाल्याने लागू झालेल्या सहा वर्षांच्या अपात्रतेमध्ये निवडणूक आयोगाने रविवारी कपात केली.
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या एका खटल्यात शिक्षा झाल्याने लागू झालेल्या सहा वर्षांच्या अपात्रतेमध्ये निवडणूक आयोगाने रविवारी कपात केल्याने सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांना आता पोटनिवडणुकीत विधानसभेवर निवडून येऊन पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर कायम राहणे शक्य होणार आहे.
एप्रिलमध्ये लोकसभेसोबत सिक्किम विधानसभेची निवडणूक झाली. त्यात अपात्रतेमुळे स्वत: तमांग यांनी निवडणूक लढविली नाही. पण त्यांच्या सिक्किम क्रांतीकारी मोर्चा या पक्षाने ३२ पैकी १७ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. विधिमंडळ पक्षाने तमांग यांची रीतसर नेतेपदी निवड केली व राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करून मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे स्वत: आमदार नसूनही तमांग लोकप्रिय सरकारचे मुख्यंमत्री झाले. पण तरीही राज्यघटनेतील तरतुदीनुसार त्यांना मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून येणे भाग होते. परंतु अपात्रता सन २०२४ पर्यंत लागू राहणार असल्याने तमांग यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून जाणेही शक्य नव्हते.
अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या तमांग यांनी यंदाच्या जुलैमध्ये निवडणूक आयोगाकडे अर्ज करून आपल्याला लागू झालेली अपात्रता रहीत करण्याची विनंती केली. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ११ अन्वये फौजदारी खटल्यात शिक्षा झाल्याने एखाद्या लोकप्रतिनिधीस लागू झालेली अपात्रता, सबळ कारणे असतील तर, पूर्णपणे रद्द करण्याचे किंवा त्यामध्ये कपात करण्याचे अधिकार निवडणूक आयोगास आहेत. तमांग यांच्या अर्जावर रविवारी निकाल देताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व निवडणूक आयुक्त सुशील चंद्र आणि अशोक लवासा यांनी या अधिकाराचा वापर केला आणि तमांग यांच्या अपात्रेमध्ये कपात करून ती एक वर्ष एक महिना एवढी केली.
काय आहे प्रकरण?
तमांग पूर्वी सिक्कीम सरकारमध्ये पशुसंवर्धनमंत्री असताना लाभार्थींना गायी वाटप करण्याची एक सरकारी योजना राबविली गेली होती. त्या योजनेच्या निधीचा अपहार केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर सन १९९६ मध्ये भ्रष्टाचाराचा खटला दाखल झाला. त्यात त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सन २०१६ मध्ये सुनावण्यात आली. पुढे नोव्हेंबर २०१७ अखेरीस अपिलांमध्ये ही शिक्षा कायम झाली. १० आॅगस्ट २०१८ पर्यंत तमांग यांनी ही शिक्षा भोगून पूर्ण केली. त्या दिवसापासून सहा वर्षांची अपात्रता लागू झाली.