सायलेंट हार्ट अटॅक सर्वांत गंभीर आव्हान

By admin | Published: March 10, 2017 05:31 AM2017-03-10T05:31:38+5:302017-03-10T05:31:38+5:30

जगभरात सायलेंट हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे, असे अमेरिकन बोर्ड आॅफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आणि अमेरिकन बोर्ड आॅफ इंटर्नल मेडिसीनचे डिप्लोमॅट डॉ. शरद जेटली यांनी म्हटले आहे.

The Silent Heart Attack is the most serious challenge | सायलेंट हार्ट अटॅक सर्वांत गंभीर आव्हान

सायलेंट हार्ट अटॅक सर्वांत गंभीर आव्हान

Next

- विकास मिश्रा

जगभरात सायलेंट हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे, असे अमेरिकन बोर्ड आॅफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आणि अमेरिकन बोर्ड आॅफ इंटर्नल मेडिसीनचे डिप्लोमॅट डॉ. शरद जेटली यांनी म्हटले आहे. ज्या रुग्णामध्ये लक्षणे दिसतात, ते लगेच डॉक्टरकडे जातात. परंतु निम्म्यापेक्षा जास्त लोकांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे इतकी कमी असतात की त्यांना डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकताच वाटत नाही. यासाठी जनजागृतीची नितांत गरज आहे, असे डॉ. जेटली म्हणाले.

डॉ. शरद जेटली हे मूळचे नागपूरचे आहेत. परंतु ते मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून अमेरिकेत वास्तव्याला आहेत. मंगळवारी ते लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार
विजय दर्डा यांच्या भेटीसाठी लोकमत कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेचा मुख्य अंश...

हृदयरोग संपूर्ण जगासमक्ष उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे काय आणि सायलेंट हार्ट अ‍ॅटक किती धोकादायक आहे?
५० टक्के हार्ट अटॅक हे सायलेंट असतात, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही मोठी गंभीर समस्या आहे. ज्या रुग्णामध्ये हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागतात, ते डॉक्टरकडे जातातच, पण ज्यांच्यात कसलेही लक्षण दिसत नाही त्यांच्या जीवाला जास्त धोका असतो. सायलेंट हार्ट अटॅक असलेला रुग्ण कसा ओळखायचा, याबाबत जगात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.

हार्ट अटॅक सायलेंट असण्यामागचे कारण काय?
यामागचे एक प्रमुख कारण मधुमेह म्हणजे डायबिटीस हे आहे. त्याच्या खोलात जाण्यासाठी संशोधन सुरू आहे. आमच्याकडे एखादा रुग्ण येतो आणि त्याला मधुमेह आहे हे कळते, तेव्हा आम्ही त्याची पूर्ण तपासणी आणि कार्डियाक वर्कअप सुरू करतो. तुम्हाला मधुमेह आहे आणि त्यामुळे सायलेंट हार्ट अटॅकची शक्यता जास्त आहे, हे त्यांना सांगतो. मधुमेह असलेल्या रुग्णाचे वय ६५ पेक्षा जास्त असेल तर शक्यता फार जास्त असते.

याची पूर्वकल्पना येईल, असा एखादा उपाय आहे काय?
एखाद्या डायबिटीसच्या रुग्णास विनाकारण घाम येत असेल, तो श्वासोच्छवास वेगाने घेत असेल आणि हृदयाची स्पंदनेही वाढली असतील तर तुम्ही सायलेंट हार्ट अटॅकचे बळी ठरत आहात, असे संकेत त्यातून मिळतात.

समजा, एखाद्या मुलाला बालपणापासूनच मीठ व साखरेची चव कळू दिली नाही, तर ते फायदेशीर ठरेल काय?
आपण भारताबाहेर गेलो की कोणत्याही देशाचे भोजन आपल्याला चविष्ट वाटत नाही. त्यांच्या
मसाल्यात लज्जत नसते. लोकांनी भोजनातील फॅटस् कमी केले आहेत आणि कमी करीतही आहेत. पण कार्बोहायड्रेट कमी करणे महत्त्वाचे आहे. आहारावर नियंत्रण असले पाहिजे.

गाईचे तूप हृदयासाठी फायद्याचे आहे काय?
होय, आहे. कोणताही दुग्धजन्य पदार्थ हृदयासाठी हानीकारक नाही. परंतु तुम्ही जास्तच तूप खात असाल तर तब्येत बिघडणारच ! सकाळचा व्यायाम फार आवश्यक आहे. ३० मिनिटे व्यायाम करायचाच आहे, असा नियम बनवा. स्नायूंना सतत व्यायामाची गरज असते. हृदय हे देखील स्नायूच आहे. तसे पाहिले तर योगा महत्त्वपूर्ण आहे.

मांसाहारी की शाकाहारी? आरोग्यासाठी नेमके काय योग्य आहे?
तुम्ही पूर्णत: शाकाहारी असाल तर हृदयरोगाचा धोका फार कमी असतो. परंतु शाकाहारी लोकदेखील तूप आणि जास्त पोळी खाऊ लागले की त्यांचे वजन वाढते. मग हृदयरोगाची समस्या निर्माण होते. मांसाहार घेणाऱ्यांनी रेड मीटपासून दूरच राहिले पाहिजे. रेड मीट हृदयासाठी चांगले नाही. चिकन व फिश ठीक आहे. फिशमधून ओमेगा ३ मिळते. परंतु फिश छोट्या तलावातील असू नयेत.

जनुकीय उपचार पद्धतीचा जगभरात किती विकास झाला आहे?
संशोधन सुरू आहे. अनेक तथ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. संशोधनकर्ते तर सांगताहेत, की नवे हृदयसुद्धा तयार करू. त्यांच्यावर विश्वास ठेवला तर येत्या १०-२० वर्षांत हे घडणार आहे. आपले नवे
हृदय निर्माण होईल. किंमत काय असणार ते सोडा! सर्वच अवयव बदलता यावेत, असा त्यांचा विचार सुरू आहे. समस्या आहे ती केवळ मेंदूची. मेंदूसुद्धा खराब होऊ शकतो ना! मेंदूसाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. कल्पना करा की असे काही निर्माण व्हावे, की मेंदूचेसुद्धा प्रत्यारोपण शक्य होईल. तूर्तास या सर्व शक्यता आहेत.

भारतात डॉक्टरांच्या प्रतिमेबाबत आपले मत काय? डॉक्टर्स तर भरपूर आहेत, पण प्रामाणिक डॉक्टर्स कमी आहेत.
हा एक समज आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची विशिष्ट पद्धत असते. तिच्यात काही वैशिष्ट्ये असतात. मी कधी कुणात भेदभाव बघितला नाही. अमेरिकेत जे काही उपलब्ध आहे, ते सर्व येथेसुद्धा आहे. डॉक्टर जबाबदार असले पाहिजे. तुम्ही जर वैमानिक असाल तर उड्डाणापूर्वी आपण ही जबाबदारी पार पाडण्याच्या स्थितीत आहात की नाही, याची शहानिशा केली जाते. वाहनचालक असेल तर त्याचा परवाना स्थायी आहे का, हे बघितले जाते. त्याचप्रमाणे एखाद्या डॉक्टरचा परवाना स्थायी असला तरी त्याच्याकडे पुरेसा अनुभव आहे का, तोे प्रीस्क्रिप्शन चांगले लिहितो का, त्याने रुग्णाचे म्हणणे व्यवस्थित ऐकून त्याची योग्य पद्धतीने तपासणी केली आहे का?, हे सर्व पाहणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वाच्या बाबतीत भारत मागे पडतो. परंतु काही वेळेला ही जबाबदारी स्वीकारली जात नसल्याचे निदर्शनास येते. अमेरिकेत डॉक्टर फोन करून विचारतात तुम्ही कसे आहात? ठीक आहात की नाही. तेथे रुग्णाबद्दल आठ-दहा पाने लिहावी लागतात. येथे तर डॉक्टर एवढे रुग्ण तपासतो मग लिहिणार कसे? समर्पण फार आवश्यक आहे.

Web Title: The Silent Heart Attack is the most serious challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.