पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम बुद्ध सारखेच - परेश रावल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 01:55 PM2017-11-27T13:55:12+5:302017-11-27T20:13:02+5:30
'जी व्यक्ती गौतम बुद्धांप्रमाणे आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन देशसेवा करण्यात व्यस्त आहे त्या आपण त्या व्यक्तीच्या राज्यात जर आपण जाती आणि धर्माच्या आधारे मतदान केलं तर ही दगाबाजी असेल. हे पाप आणि अनैतिक ठरेल' असं परेश रावल बोलले आहेत.
राजकोट - भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना गौतम बुद्धाशी केली आहे. 'येत्या विधानसभा निवडणुकीत गौतम बुद्धासारख्या नरेंद्र मोदींच्या मायभूमीत जात आणि धर्माच्या आधारे मतदान करणं पाप आणि अनैतिक ठरेल', असं परेश रावल बोलले आहेत. राजकोटमध्ये ‘मन की बात, चाय के साथ’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी परेश रावल यांनी उपस्थितांना प्रश्नही विचारला की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा असावा की राहुल गांधींसारखा'.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती मिळणं कठीण आहे. खूप पूजा आणि प्रार्थना केल्यानंतरच अशी व्यक्ती मिळते. असं विराट व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती अवतार घेते. राजकारणातून अशी व्यक्ती जन्म घेऊच शकत नाही. जी व्यक्ती गौतम बुद्धांप्रमाणे आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन देशसेवा करण्यात व्यस्त आहे त्या आपण त्या व्यक्तीच्या राज्यात जर आपण जाती आणि धर्माच्या आधारे मतदान केलं तर ही दगाबाजी असेल. हे पाप आणि अनैतिक ठरेल. आपण असं करु शकत नाही. आपण सरदार पटेल आणि महात्मा गांधींच्या मायभूमीवरील लोक आहोत', असं परेश रावल बोलले आहेत.
परेश रावल पुढे म्हणालेत की, 'देवाकडे प्रार्थना करा, आपल्या कुलदैवतेचं स्मरण करा, आपल्या आई-वडिलांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा, आपल्या शिक्षकांनी काय शिकवलं होतं ते आठवा, आपला हात छातीवर ठेवा आणि इमानदारीने स्वत:ला प्रश्न विचारा की, तुम्हाला आपल्या मुलाला राहुल गांधी बनवायचं आहे की नरेंद्र मोदी. जे तुमचं उत्तर असेल त्यालाच मतदान करा'.
राहुल गांधीचं राजकीय करिअर वाचवण्यासाठीच पाटीदार नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित कार्यकर्ता जिग्नेश मेवानीचा वापर केला जात असल्याचा अंदाज परेश रावल यांनी व्यक्त केला आहे.
परेश रावल यांनी सांगितलं की, '2007 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मला विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक जिंकणार असल्याचं सांगितलं होतं. 2012 मध्ये जेव्हा मी त्यांना अजेंडा विचारला तेव्हाही त्यांनी विकास हेच उत्तर दिलं. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा 1980च्या निवडणुकीत इंदिरा गांधी पुनरागमनासाठी प्रयत्न करत होत्या तेव्हा एक घोषणा देण्यात आली होती ‘इंदिरा गांधी लाओ, देश बचाओ’. नंतर सोनिया गांधी आल्या आणि घोषणा बदलली की, ‘सोनियाजी लाओ, देश बचाओ’. शेवटी राहुल गांधी आले आणि घोषणा बदलली, ‘अल्पेश, हार्दिक, जिग्नेश लाओ और राहुलभाई बचाओ’. पण मोदींनी नजर विकासावरच खिळली आहे'.