CoronaVirus News: ...तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अत्यंत कमी; भारताची वाटचाल अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सच्या दिशेनं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 02:07 PM2021-06-27T14:07:24+5:302021-06-27T14:07:44+5:30
CoronaVirus News: देशातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. सध्या लसीकरणाला वेग देण्याचं काम देशभरात सुरू आहे. जगातील बऱ्याच देशांमध्ये लसीकरण अभियान मोफत सुरू आहे. लसीकरण कोरोना विरुद्धच्या लढ्यातलं सर्वात प्रभावी हत्यार असल्यानं सगळेच देश लसीकरण मोहिमेला गती देत आहेत. देशातील २० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झाल्यास तिथे कोरोनाची लाट येत नसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे.
अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्ससारख्या देशांमधील २० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिथे कोरोनाची लाट आलेली नाही. या देशांशी तुलना केल्यास भारतानं नुकताच एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. देशातील २५.९८ कोटी (२०.९५ टक्के) नागरिकांचं लसीकरण झालं आहे. यातील ५.५२ कोटी (४.४५ टक्के) नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. ७० टक्के लोकसंख्येला किमान एक डोस दिला गेल्यास तिसऱ्या लाटेचा झोका टाळता येऊ शकेल. मात्र डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव पाहता अनेक तज्ज्ञ ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवत आहेत.
देशात आतापर्यंत ३१ कोटींहून अधिक डोसचा वापर झाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ६५ कोटी डोस तयार होतील. म्हणजेच ऑक्टोबरच्या आधी ९६ कोटी डोस वापरले जातील. देशातील १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ८५ कोटी आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या आधी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र ७० टक्के लसीकरण शक्य आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील लसीकरणाचा वेग वाढला आहे. गेल्या ६ दिवसांत ४ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे.