अरविंद व नेमाडे यांच्यात साम्य : पंतप्रधान

By admin | Published: April 26, 2015 01:45 AM2015-04-26T01:45:40+5:302015-04-26T01:45:40+5:30

योगी अरविंद व भालचंद्र नेमाडे यांच्यात मला साम्य वाटते, अशी तुलना करून ‘या दोघांची साहित्यिक जडणघडण एकसारखी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालचंद्र नेमाडे यांचा गौरव केला.

Similarity between Arvind and Nemade: Prime Minister | अरविंद व नेमाडे यांच्यात साम्य : पंतप्रधान

अरविंद व नेमाडे यांच्यात साम्य : पंतप्रधान

Next

कोसलाकारांना ज्ञानपीठ प्रदान : जे सत्य तेच लिहीन, गावाने मला घडविले : नेमाडे
रघुनाथ पांडे ल्ल नवी दिल्ली
योगी अरविंद व भालचंद्र नेमाडे यांच्यात मला साम्य वाटते, अशी तुलना करून ‘या दोघांची साहित्यिक जडणघडण एकसारखी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालचंद्र नेमाडे यांचा गौरव केला.
देशीवादाचे प्रवर्तक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यिक योगदानासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसद ग्रंथालयाच्या बालयोगी सभागृहात हा सोहळा झाला. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा प्रसिध्द लेखक नामवर सिंह, ज्ञानपीठ संस्थेचे संचालक लीलाधर मंडलोई , संस्थेच्या आजीव सदस्य तथा लेखिका त्रिशला जैन, संस्थेचे आजीव सदस्य साहू अखिलेश जैन मंचावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पुस्तकाला हवी तेवढी प्रतिष्ठा का मिळत नाही. घर बांधताना किंवा घरातील इंटेरिअर करताना विविध शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी जागा केली जाते. पण बूकशेल्फचा विचारही होत नाही. तरूणांनी हा विचार करायला हवा. दुनिया संगणकाची होत असली तरी ग्रंथाचे महत्त्व असलेच पाहिजे. त्यासाठी मन सतत तयार असले पाहिजे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विविध उदाहरणे देऊन देशाच्या विकासात साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान व विज्ञानाच्या युगात डॉ. नेमाडेंनी वैविध्यपूर्ण लिखाण करून येणाऱ्या पिढींना अक्षरदेण दिली आहे असे म्हटले. योगी अरविंद आणि नेमाडे यांच्यात आपल्याला साम्य वाटते असे सांगून ते म्हणाले, अरविंद गावातून आले होते, त्यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले होते व त्यांनी त्यांची साहित्यनिर्मिती त्यांच्या मातृभाषेतूनच केली. डॉ. नेमाडे यांचेही असेच आहे.’ डॉ. नामवर सिंह यांनी डॉ. नेमाडे यांच्या भारतीय साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात इंदू जैन यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने झाली.

भाषण इंग्रजीतून केले; विचार देशी असूनही इंग्रजीत बोलत असल्याचा खुलासा
डॉ. नेमाडे म्हणाले,भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार जसा सुखावून जातो तसाच तो जबाबदारीची आठवणही करून देतो, ही जाणीव ठेवत मी मानवतेसाठी लिखाण करीन व सत्य तेच लिहीन. मला माझ्या गावाने मोठे केले. घडविले. तेथील संस्कार मला प्रेरणा देतात. माझा गावात सात बोलीभाषा, पाच भाषा व सहा धर्मांचे लोक राहतात.

भारतीय संगीत व नृत्य तिथे बहरले. जरी मी नास्तिक असलो तरीही भारतीय संस्कृतीतील प्रतीकांचा मी आदर करतो. संशोधनासाठी जगात फिरलो; पण भारतीय संस्कृती व सभ्यता महान आहे. जग एका वळणावर उभे आहे, तेव्हा ही संस्कृती आपण टिकवण्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत. ज्ञानपीठ पुरस्कार्त्यांची यादी पाहिली की हा पुरस्कार घेण्याची आपली योग्यता नाही असे वाटते. त्यामुळÞे या क्षणापासून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे.

नेमाडे यांनी आपले भाषण इंग्रजीतून केले. साहित्य व विचार देशी असूनही आपण इंग्रजीतून बोलत असल्याचा खुलासा करताना ते म्हणाले, आपल्या देशाला गुलामगिरीचे गालबोट लागले आहे. त्यामुळे मी इंग्रजीतून बोलू शकतो. जे चांगले आहे, ते स्वीकारले पाहिजे.

 

Web Title: Similarity between Arvind and Nemade: Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.