‘सिमी’चे शिबिर घेणारे १८ ठरले दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:48 AM2018-05-15T06:48:59+5:302018-05-15T06:48:59+5:30
केरळच्या इद्दुकी जिल्ह्याच्या वागामोन गावात ‘स्टुडन्टस इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण शिबिर गुप्तपणे आयोजित केले जाण्याशी संबंधित खटल्यात येथील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने सोमवारी १८ आरोपींना दोषी ठरविले.
कोची : केरळच्या इद्दुकी जिल्ह्याच्या वागामोन गावात ‘स्टुडन्टस इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण शिबिर गुप्तपणे आयोजित केले जाण्याशी संबंधित खटल्यात येथील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने सोमवारी १८ आरोपींना दोषी ठरविले.
एकूण ३५ आरोपींवर हा खटला चालला. हे आरोपी भोपाळ, नवी दिल्ली, बंगळुरु आणि अहमदाबाद येथील कारागृहांत असल्याने न्यायाधीश कौसर इद्दापगाथ यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून खटला चालवला. जे १८ आरोपी दोषी ठरले त्यांत केरळचे चौघे आहेत. त्यात अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या शिमली व शिबली या दोन भावांचाही समावेश आहे. आरोपींना देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, गुन्हेगारी कट रचणे तसेच शस्त्र कायद्याच्या विविध कलमान्वये दोषी ठरविले गेले.
वागामोनमधील थंगलपाडा येथे १० ते १२ डिसेंबर २००७ दरम्यान ‘सिमी’चे ने गुप्तपणे शिबिर घेतले. हे समजल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपासाअंती एकूण ३८ आरोपींना अटक केली. वासिक बिल्लासह दोन आरोपी फरार असून मेहबूब मलिक हा २००१६ मध्ये भोपाळ कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता. (वृत्तसंस्था)
>भारतीय बिन लादेनचा सहभाग
या शिबिरात युद्धकला, शस्त्रे चालविणे, बॉम्ब तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले गेले. याच शिबिरांमधून पुढे ‘इंडिन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला. या प्रशिक्षणाचा उपयोग करून नंतर देशात अनेक घातपात करण्यात आले. नंतर ‘भारतीय बिन लादेन’ म्हणून ओळखल्या गेलेल्या व ‘इंडियन मुजाहिदीन’चा संस्थापक सदस्य अब्दुल शुभान कुरेशी ऊर्फ तकीर यानेही वागामोन शिबिरात प्रशिक्षण घेतले होते.