सिमीच्या ८ अतिरेक्यांचा चकमकीत मृत्यू

By Admin | Published: November 2, 2016 03:58 AM2016-11-02T03:58:10+5:302016-11-02T03:58:10+5:30

सिमीचे (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया) आठही अतिरेकी आरोपी भोपाळलगतच्या इटखेडी भागातील अचारपुरा येथे पोलीस चकमकीत मारले गेले.

SIMI's encounter with 8 terrorists | सिमीच्या ८ अतिरेक्यांचा चकमकीत मृत्यू

सिमीच्या ८ अतिरेक्यांचा चकमकीत मृत्यू

googlenewsNext


भोपाळ : भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगातून सोमवारी पहाटे हेड कॉन्स्टेबलची हत्या करून पळून गेलेले सिमीचे (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया) आठही अतिरेकी आरोपी भोपाळलगतच्या इटखेडी भागातील अचारपुरा येथे पोलीस चकमकीत मारले गेले. मात्र ही चकमक खरी होती का, याविषयी संशय निर्माण झाली असून, या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुरू झाली
आहे. या आठही जणांच्या
कुटुंबीयांनी या मागणीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मध्य प्रदेश सरकारला दिल्या आहेत. राज्य सरकारने तडकाफडकी कारवाई करताना कारागृह अधीक्षक अखिलेश तोमर यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, पलायन प्रकरणाची चौकशी राज्याचे माजी पोलीस महासंचालक नंदन दुबे तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत.
पळून गेलेल्या या आठही जणांची माहिती देणाऱ्यांस प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस राज्य सरकारने लगेचच जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनी इटखेडी भागात घेरले. त्यांनी आमच्यावर गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल आम्हालाही गोळीबार करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या गोळीबारात आठही जण मरण पावले. मात्र ही चकमक बनावट असल्याचा आरोप काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट, आॅल इंडिया मजलिस ए मुसलमीन तसेच बहुजन समाज पार्टी यांनी केला असून, त्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी दिग्विजय सिंग, प्रकाश करात, ओसेउद्दिन ओवेसी व मायावती या नेत्यांनी केली आहे.
अशी मागणी करण्यास कारण घडले, ते एका व्हिडीओचे. या आठ जणांना ठार मारल्याचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात एका पोलिसाचा आवाजही ऐकू येत आहे, ज्यामध्ये तो ‘जिवंत आहे, त्याला मारा, गोळ्या घाला’, असं बोलतोय. तर अजून एक आवाज येत आहे जो ‘छातीत मार, तो मरेल’, असं बोलत आहे.
या व्हिडीओमुळे पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
आहे. एका व्हिडीओमध्ये आठपैकी पाच जण दोन्ही हात वर करून
आपण शरण यायला तयार असल्याचे पोलिसांना सांगत असल्याचे दिसत आहे, तर एका दृश्यात गोळीबारामुळे जखमी झालेला एक अतिरेक्याच्या हातांची हालचाल सुरू
असताना पोलीस त्याला अगदी जवळून गोळी मारत असल्याचे दिसत आहे.
हे व्हिडीओ एनडीटीव्ही, एबीपी न्यूज या वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपित करताच खळबळ माजली. त्यानंतरच चकमकीबद्दल संशय उपस्थित करण्यात आला. त्यावर भाजपा नेत्यांनी अतिरेक्यांना सर्वांनी एका सूरात विरोध करायला हवा, त्यांना मारल्याबद्दल शंका घेणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. दुसरीकडे या आठ जणांवरील आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्यांना ठार मारणे चुकीचे आहे आणि मध्य प्रदेश सरकारच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. या व्हिडीओमधील सत्यता तपासली जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, अतिरेक्यांना शरण येण्यास सांगितल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. आमच्यावर दगडफेकही केली, त्यामुळे आम्हाला गोळीबार करावा लागला. सुमारे एक तास गोळीबार सुरू होता. भोपाळ पोलीस, गुन्हे शाखा आणि एसटीएफचे ११ जवान या मोहिमेत सहभागी होते. इंदूरहून गृह मंत्रालयाला मिळालेल्या गुप्तचर अहवालात सिमीचे अतिरेकी पळून जाण्याची शक्यता वर्तविली होती, अशी माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली होती. (वृत्तसंस्था)
>हलगर्जीपणामुळे?
केंद्रीय गृह मंत्रालयाने तुरुंग फोडण्याच्या या घटनेबाबत विस्तृत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. कारागृह प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचा हलगर्जीपणा झाला काय, हे तपासण्यासह अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, हे जाणून घेण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
>दुसरे पलायन
आठपैकी पाच जणांनी ३० सप्टेंबर २०१३ रोजी खंडवा कारागृहातून पलायन केले होते.
या दहशतवाद्यांवर खंडवा येथे
एटीएस जवान सीताराम आणि दोन लोकांची
हत्या तसेच रतलाम येथे एटीएस जवानाची हत्या, देशद्रोह, बँकेत दरोडा, लूटमार यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद होती.
>रमाशंकर याच्या मुलीचा होता डिसेंबरात विवाह
भोपाळ : सोमवारी पहाटे २ ते ३ वाजेदरम्यान बी ब्लॉकमध्ये असलेले सिमीचे आठ संशयित अतिरेकी फरार झाले. अतिरेक्यांनी आधी बरॅक तोडले. त्यानंतर स्टीलच्या धारदार प्लेटने हेड कॉन्स्टेबल रमाशंकर यांची गळा कापून हत्या करण्यात आली. दुसरा सुरक्षारक्षक चंदन याला बांधून ठेवले. तेथून ते आठही जण कारागृहाच्या भिंतीपर्यंत पोहोचले. बेडशीट एकमेकांना बांधून सर्वांनी कारागृहाची भिंत चढून पोबारा केला.
रमाशंकर यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि आपणास रात्रीची ड्यूटी नको, अशी विनंती त्यांनी तुरुंग प्रशासनाला अनेकदा केली होती. पण त्यांचे ऐकण्यात आले नाही. तसेच ज्या भागात त्यांची ड्यूटी होती, तिथे अतिरेकी असतानाही त्यांच्या हाती शस्त्र दिले नव्हते, अशी तक्रार त्याची मुलगी सोनिया हिने केली. तिचा विवाह ९ डिसेंबर रोजी करण्याचे ठरले होते. तिच्या विवाहाच्या तयारीत तिचे काका आणि इतर नातेवाईक गुंतले होते. घरी दिवाळीच्या आनंदाचे वातावरण होते आणि सोनियाच्या विवाहाची धावपळ सुरू होती. पण रमाशंकर यांच्या मृत्युमुळे त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. रमाशंकर यांची शंभुनाथ आणि प्रभुनाथ ही दोन्ही मुले लष्करात आहेत. रमाशंकर सिंह यांचा अंत्यविधी मंगळवारी सकाळी झाला त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. त्यांनी रमाशंकर यांच्या कुटुंबीयांना १0 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच मुलीच्या विवाहासाठी आणखी ५ लाख रुपये राज्य सरकारतर्फे देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Web Title: SIMI's encounter with 8 terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.