राष्ट्रपती भवनात मागील रांगेत 'त्या' बसल्या होत्या; अधिकाऱ्यांनी पाहिले अन् तातडीने पुढे बसवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 03:00 PM2023-04-07T15:00:35+5:302023-04-07T15:01:21+5:30
सामान्यपणे जर एखाद्या देशाची फर्स्ट लेडी दुसऱ्या देशात जात असेल तर त्यांना सुरक्षा पुरवली जाते.
नवी दिल्ली - इंन्फोसिसचे फाऊंडर एनआर नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्या साधेपणाची अनेक उदाहरणे समोर आलीत. बुधवारी राष्ट्रपती भवनातही हे पाहायला मिळाले. सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले. या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी कुटुंबातील सर्व लोक सहभागी झाले होते. सुधा मूर्ती यांची मुलगी आणि ब्रिटनची फर्स्ट लेडी अक्षता मूर्तीही या कार्यक्रमात उपस्थित होत्या. वडिलांसह त्या मागील रांगेत बसल्या होत्या.
कुठल्याही दिखाव्याविना अक्षता मूर्ती आरामात बसल्या होत्या. परंतु तेव्हा अधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यानंतर तात्काळ अक्षता मूर्ती यांना विनंती करून पुढे केंद्रीय मंत्र्यांच्या रांगेत बसवण्यात आले. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांची पत्नी असल्याने अक्षता मूर्ती यांना ब्रिटनच्या फर्स्ट लेडीचा दर्जा आहे. म्हणजे त्या केवळ सुधा मूर्ती यांची कन्या नाहीत तर एका देशाच्या फर्स्ट लेडी आहेत.
राजशिष्टाचारानुसार त्यांना योग्य सन्मान द्यायला हवा. राष्ट्रपती भवनात जेव्हा अधिकाऱ्यांची नजर अक्षता मूर्ती यांच्यावर पडली तेव्हा तातडीने राजशिष्टाचार लक्षात घेता त्यांना विनंती करून पुढील रांगेत बसण्यास सांगितले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बाजूला त्या बसल्या होत्या.
अक्षता जेव्हा वडील नारायण मूर्ती, भाऊ रोहन मूर्ती आणि आई सुधा मूर्ती यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात पोहचल्या तेव्हा एकही ब्रिटीश अधिकारी त्यांच्या सुरक्षेसाठी नव्हता. सामान्यपणे जर एखाद्या देशाची फर्स्ट लेडी दुसऱ्या देशात जात असेल तर त्यांना सुरक्षा पुरवली जाते. परंतु अक्षता मूर्ती यांच्याभोवती सुरक्षेचे कडे नव्हते. अक्षता मूर्ती यांची ओळख अधिकाऱ्यांना झाली तेव्हा त्यांनी राजशिष्टाचारानुसार केवळ अक्षता यांना पुढे बसण्याची विनंती केली. बाकी कुटुंब मधल्या रांगेत बसले होते.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांचे कुटुंबीयही त्याच रांगेत बसले होते. अक्षता मंत्री जयशंकरच्या शेजारी बसली होत्या. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हेही या पंक्तीत होते. विशेष म्हणजे सुधा मूर्ती यांना सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कारासाठी आई सुधाचे नाव पुकारले असता अक्षता या टाळ्या वाजवताना दिसल्या. मधल्या रांगेत बसलेले असताना नारायण मूर्ती आणि मुलगा रोहनही आनंदाने टाळ्या वाजवल्या. अक्षताने २००९ मध्ये ऋषी सुनकसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत.