काँग्रेसची सूत्रे तरुणांकडे सोपवा
By Admin | Published: May 22, 2016 04:17 AM2016-05-22T04:17:39+5:302016-05-22T04:17:39+5:30
काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर
नवी दिल्ली : काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता युवकांच्या हाती सूत्रे सोपवण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, मी मोठ्या सर्जरीबाबत बोललो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परंतु आता आपल्याकडे युवकांच्या हाती सत्ता सोपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. पक्षाच्या दृष्टीनेही हे गरजेचेच आहे. भारताच्या लोकसंख्येत युवकांची संख्या लक्षणीय आहे. युवक आणि मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा जाणून घेणे आवश्यक झाले आहे. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, त्या पक्षाने राष्ट्रवादाचा मुखवटा धारण केला आहे. पण त्यांचे खरे धोरण फोडा-तोडा आणि राज्य करा, असे ब्रिटिशांसारखेच आहे. आधुनिक भारताचा पाया राजीव गांधी यांनीच रचला होता. ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कधीही भाग घेतला नाही, ते आता समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ते तरुणांची आणि देशाची दिशाभूल करीत आहेत. आमची लढाई कोणत्या व्यक्तीविरुद्ध नसून, एका विचारधारेशी आहे. संघाची विचारधारा देशात दुही निर्माण करण्याची आहे, असा आरोपही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)