पाक, चीनवर एकाच वेळी नजर ठेवणारे क्षेपणास्त्र; पंजाबमध्ये तैनाती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 05:47 AM2022-01-02T05:47:44+5:302022-01-02T05:48:00+5:30
भारताने सुमारे पाच अब्ज डाॅलर्सपेक्षा जास्त रक्कम एस-४०० साठी माेजली आहे. रशियासाेबत हा व्यवहार केल्यामुळे अमेरिकेने डाेळे वटारले हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तान या दाेन शत्रूंवर एकाच वेळी नजर ठेवून भारताने एस-४०० क्षेपणास्त्र युनिटला पंजाबमध्ये तैनात केले आहे. पंजाबमध्ये वायुसेनेच्या पाचपैकी एका तळावर ही यंत्रणा सध्या तैनात करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानच्या सीमेपासून हे तळ सर्वात जवळ आहे.
दाेन्ही शत्रूंच्या काेणत्याही हल्ल्याला उधळून लावण्यास सक्षम असलेली ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतली आहे. या क्षेपणास्त्र यंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे, ४०० किलाेमीटर अंतरावरून केलेल्या काेणत्याही हल्ल्याला निष्क्रिय करण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे. शत्रूची विमाने आणि क्रूझ क्षेपणास्त्रांना ४०० किलाेमीटर अंतरावरूनच राेखणे भारताला शक्य आहे. या यंत्रणेसाठी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. दक्षिण आशियामध्ये यामुळे भारताचे वजन वाढणार आहे.
भारताने सुमारे पाच अब्ज डाॅलर्सपेक्षा जास्त रक्कम एस-४०० साठी माेजली आहे. रशियासाेबत हा व्यवहार केल्यामुळे अमेरिकेने डाेळे वटारले हाेते.
एकाच वेळी १००-३०० लक्ष्यांना भेदण्यास सक्षम
एस-४०० युनिटमध्ये ४००, २५०, १२० आणि ४० किलाेमीटर अंतरापर्यंत मारा करू शकणाऱ्या चार वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. एकाच वेळी १०० ते ३०० लक्ष्यांना भेदण्यात ही यंत्रणा सक्षम आहे.