अरुणाचलात ‘सियांग’चे पाणी गढूळ, संशयाची सुई चीनकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:43 AM2017-11-30T01:43:36+5:302017-11-30T01:43:56+5:30
अरुणाचल प्रदेशची जीवनरेखा म्हणून ज्या नदीची ओळख आहे त्या सियांग नदीचे पाणी काळे आणि गढूळ झाल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. या पाण्यात सिमेंटसारखा पदार्थ मिसळला असल्याची शक्यता आहे.
गुवाहाटी : अरुणाचल प्रदेशची जीवनरेखा म्हणून ज्या नदीची ओळख आहे त्या सियांग नदीचे पाणी काळे आणि गढूळ झाल्यामुळे
काळजी व्यक्त केली जात आहे. या पाण्यात सिमेंटसारखा पदार्थ मिसळला असल्याची शक्यता आहे. यामुळे मासे मरत असून या प्रकारामागे चीनचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पूर्व सियांग जिल्ह्यातील अधिका-यांनी सांगितले की, पाणी एवढे गढूळ झाले आहे की, ते वापरणे अशक्य आहे. दीड महिन्यात अनेक मासे मेले आहेत.
उपायुक्त तमू टाटक यांनी सांगितले की, पावसाळ्यात पुरासोबत गाळ येतो तेव्हा पाणी गढूळ होते. मात्र, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात पाणी अतिशय शुद्ध असते. नदीच्या वरच्या भागात चीनच्या क्षेत्रात काही खोदकाम सुरु असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नेमकी परिस्थिती काय आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.
अशी आहे सियांग नदी
सियांग ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. दक्षिण तिबेटमधून ती १६०० किमी वाहत येते. सियांग नदीला दिहांग म्हणूनही ओळखले जाते. २३० किमी वाहत आल्यानंतर ती लोहीत नदीला मिळते.