एका सिंहाला कैद, १६ सुटले!
By Admin | Published: July 9, 2016 02:42 AM2016-07-09T02:42:00+5:302016-07-09T02:42:00+5:30
गुजरात वन विभागाने १७ खतरनाक सिंहांपैकी १६ सिंहांची सुटका केली असून, एकाला प्राणिसंग्रहालयात पाठविले आहे. तीन गावकऱ्यांची शिकार केल्यानंतर या सिंहांना धारीच्या अंबार्डी
अहमदाबाद : गुजरात वन विभागाने १७ खतरनाक सिंहांपैकी १६ सिंहांची सुटका केली असून, एकाला प्राणिसंग्रहालयात पाठविले आहे. तीन गावकऱ्यांची शिकार केल्यानंतर या सिंहांना धारीच्या अंबार्डी भागातून पकडण्यात आले होते.
या सिंहांना जेथून पकडण्यात आले होते तेथेच त्यांना सोडण्यात आले. त्यांची सुटका झाली असली तरी त्यांच्यावर पाळत ठेवली जाईल. माणूस दिसल्यानंतर ते आक्रमक होतात वा नाही हे तपासले जाईल, असे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
तीन माणसांच्या शिकारीची घटना घडल्यानंतर गुजरात वन विभागाने संशयित सिंहांवर नजर ठेवून त्यांच्या विष्ठेचे नमुने घेतले होते. या नमुन्यांत काही प्रमाणात मानवी अवशेष आढळून आल्यामुळे त्यांना पकडण्यात आले होते. तीन महिन्यांत तीन माणसांच्या शिकारीच्या घटना घडल्या होत्या. अंबार्डीत १९ मार्च रोजी जिना मकवाना (६०) यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर १० एप्रिल रोजी भरद गावाजवळ लभू सोळंकी यांचा मृतदेह आढळला होता. अलीकडे २१ मे रोजी जेराज देवीपूजक झोपेत असतानाच ठार करून ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले होते. (वृत्तसंस्था)