एकच ध्यास; श्रीराम मंदिराचे काम २२ जानेवारीपूर्वी पूर्ण करणारच; चंपतराय बन्सल यांची माहिती
By यदू जोशी | Published: December 27, 2023 05:47 AM2023-12-27T05:47:04+5:302023-12-27T05:48:38+5:30
उद्घाटनानंतर भाविकांसाठी खुले करणार मंदिर.
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या ( Marathi News ): जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्री रामाचे मंदिर उभारण्याचा ध्यास प्रत्येकानेच घेतला आहे. पण २२ जानेवारीच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत असल्याने तत्पूर्वी मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.
उद्घाटनानंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्याची तयारी करत आहोत, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टचे महामंत्री आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपतराय बन्सल यांनी सांगितले.
सध्या मंदिर परिसरात ५० अभियंते, चार हजार मजूर दिवस-रात्र राबत आहेत. याशिवाय अन्यत्र सुरू असलेल्या कामावर आठ हजार मजूर कार्यरत आहेत. मी मेहनत करतो, मला मजुरी मिळते; पण त्या पलीकडे मला देवकार्याची संधी मिळाल्याचे विजय या मजुराने सांगितले.
२२ जानेवारीपर्यंत मुख्य मंदिराचा तळमजला आणि पहिल्या मजल्याचे काही बांधकाम पूर्ण केले जाईल. तळमजल्यावर रामलल्लांची (बालमूर्ती) आणि लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मूर्ती तसेच प्रभू रामाची पाच फुटाची एका मूर्ती यांची प्रतिष्ठापना उद्घाटनावेळी केली जाणार असल्याची माहिती चंपतराय यांनी दिली.
मुख्य मंदिराची उभारणी एका टोकाला का?
संपूर्ण परिसराच्या उत्तर भागात रामलल्लांचे मुख्य मंदिर उभारले जात आहे. ते मध्यवर्ती ठिकाणी का नाही? याबाबत ट्रस्टचे चंपतराय म्हणाले, हिंदू समाजाने प्रभू रामांचे जन्मस्थान मुक्त व्हावे म्हणून नेमका ज्या जागेसाठी अनेक वर्षे संघर्ष केला आणि जिथे प्रभू रामांचा जन्म झाला, त्याच जागेवर गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणार आहे. तळमजल्यावर या मूर्तींची प्रतिष्ठापना होईल. पहिल्या मजल्यावर सिंहासनाधिष्ठित प्रभू राम आणि अन्य मूर्ती असतील. मंदिराचे शिखर १६१ फूट उंचीचे असेल.
मंदिर परिसरात काय काय असेल?
श्रीराम यांच्या जीवनकार्याशी निगडीत महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्ती ऋषी, राजा निषाद, माता शबरी यांची मंदिरे. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर व मध्यभागी जगद्गुरू शंकराचार्य यांच्या ‘पंचायतन’ संकल्पनेतून सूर्य, शंकर, भगवती, गणपती, भगवान विष्णू यांची मंदिरे उभारणार. २५ हजार लॉकर असलेल्या भक्त सुविधा केंद्रात विश्रांती केंद्र, स्वच्छतागृहांची साेय.
७० एकरच्या परिसरात अयोध्येत दिमाखदार मंदिराची उभारणी केली जात आहे. २५ टक्के जागेवर पहिल्या टप्प्यात मुख्य मंदिरासह विविध मंदिरे आणि सुविधा केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. विस्तारावेळी आणखी पाच टक्के जमिनीचा वापर केला जाईल. या परिसरात असलेल्या प्राचीन शिव मंदिराचे जतन आणि जीर्णोद्धार करण्यात येत आहे. ६०० वृक्षांसह हा परिसर हिरवागार असेल.
अयोध्या नगरीत मंदिराव्यतिरिक्त सध्या सर्वत्र उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा ‘ॲक्शन मोड’वर दिसतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दर महिन्याला अयोध्येत येऊन मंदिरासह विविध कामांचा आढावा घेतात. सोबत केंद्र सरकारने नियुक्त केलेले बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेन मिश्रा, उत्तर प्रदेशने नियुक्त केलेले अवनिश अवस्थी असतात.
त्या विटा गेल्या कुठे?
राम मंदिर बांधकामासाठी विश्व हिंदू परिषदेने काही वर्षांपूर्वी गावोगावी विटा जमा केल्या होत्या. अशा ४ लाख २७ हजार विटा या मंदिर परिक्रमा मार्गाच्या उभारणीसाठी आतापर्यंत वापरल्या आहेत. केवळ पाच विटा शिल्लक असून, मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयात त्या ठेवण्यात येणार आहेत.