अविवाहित ग्रामस्थांनी वधूच्या स्वागतासाठी डोंगरात खोदला रस्ता
By admin | Published: April 1, 2015 11:57 PM2015-04-01T23:57:43+5:302015-04-01T23:57:43+5:30
गेल्या कित्येक दशकांपासून बिहारमधील खारवार आदिवासी जमातीचे ३ हजार लोक आपल्या गावाचा रस्ता सरकार बांधेल काय याची वाट पाहत होते
पाटणा : गेल्या कित्येक दशकांपासून बिहारमधील खारवार आदिवासी जमातीचे ३ हजार लोक आपल्या गावाचा रस्ता सरकार बांधेल काय याची वाट पाहत होते. पाटणा शहरापासून ३०० कि.मी. नैर्ऋत्येकडे असणारे बारवान कलान व बारवान खुर्द या दोन खेड्यांना हा रस्ता हवा होता. उत्तर प्रदेशाच्या सीमेवर कैमूर पठारावर ही खेडी वसलेली असून, या दोन्ही खेड्यांत मिळून १३० अविवाहित पुरुष असून, इतर कोणत्याही गावातील अविवाहित युवकांपेक्षा ही संख्या जास्त आहे.
सरकारी अधिकारी या खेड्यांना जोडणारा रस्ता तयार करण्यास असमर्थता दाखवत असत. हा भाग अभयारण्याशी जोडलेला असल्याने या भागात कोणताही बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
त्यानंतर येथील अविवाहित युवकांनी रस्ता बांधण्याचे काम हाती घेतले. रस्ता बांधण्यासाठी डोंगर पोखरणे गरजेचे होते. दोन महिने काम करणाऱ्या युवकांनी हे आव्हान स्वीकारले. पारंपरिक हत्यारांचा वापर करून हा रस्ता तयार करण्यात आला. आता या रस्त्यावरून मोटारसायकली व टॅ्रक्टर जाऊ शकतात. आदिवासी लोकांसाठी रोजचे जीवनही कठीण असते. या आधी या खेड्यांतील लोकांना दोन टेकड्या पार करून जवळच्या गावात जाण्यासाठी चार तास चालावे लागत असे, आता फक्त ५ कि.मी. पायी चालल्यास जवळचे गाव येते. लोकांना भेटण्यासाठी आता मोटारसायकलवरून जाता येते व टॅ्रक्टरमधून बारातही जाऊ शकते, असे २६ वर्षांचा संतोष खारवार म्हणतो.
(वृत्तसंस्था)