सर, लग्नानंतर गुडन्यूज द्यायचीय, 15 दिवसांची सुटी द्या! पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:33 PM2022-08-01T12:33:49+5:302022-08-01T12:34:48+5:30
या पत्राने अधिकाऱ्यांना विचार करायला भाग पाडले आहे. याचबरोबर या व्हायरल पत्रावर चवीने चर्चादेखील होत आहे.
सरकारी नोकर असुदे की खासगी सुट्ट्या मिळविण्य़ासाठी काही ना काही कारणे द्यावीच लागतात. काहीवेळा ही कारणे देखील एवढी भन्नाट असतात की त्यांची चर्चा होते, सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने लग्नानंतरची गुडन्यूज देण्यासाठी सुट्टी हवीय असा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केलाय.
लग्नाला सात महिने झाले आहेत. अद्याप आनंदाची बातमी मिळालेली नाहीय. यामुळे १५ दिवसांची सुट्टी देण्याची कृपा करावी असे या पोलीस कर्मचाऱ्याने अर्जात म्हटले आहे. यामुळे हा अर्ज बलिया जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला होता. पत्नीने डॉक्टरच्या सल्ल्यावरून औषधे सुरु केली आहेत. त्या दिवसांत तिच्यासोबत रहावे लागणार आहेत. यामुळे मला १५ दिवसांची सुटी मिळाली तर मेहरबानी होईल, असे या पोलिसाने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशपोलिसांमध्ये हे पत्र व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजुंनी चर्चा होत आहेत. पोलीस खूप तनावात असतात. कधी दिवसा, कधी रात्री, तर कधी दिवस रात्र ड्युटी करावी लागते. अशावेळी ते आपल्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे पोलिसांना या समस्या, आरोग्याच्या समस्या भेडसावतात. या पत्राने अधिकाऱ्यांना विचार करायला भाग पाडले आहे. याचबरोबर या व्हायरल पत्रावर चवीने चर्चादेखील होत आहे.
यूपी पोलिस विभागात महिलांसाठी प्रसूती रजेची आणि पुरुषांसाठी पितृत्व रजेची तरतूद आहे. ही रजा महिलांसाठी 180 दिवस आणि पुरुषांसाठी 15 दिवस आहे. ही रजा संपूर्ण नोकरीदरम्यान दोनदाच घेता येते.