सिसोदियांचे पहिल्यांदाच अबकारी घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये नाव, जामीनावर उद्या निर्णय, अडचणी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:17 PM2023-04-25T19:17:25+5:302023-04-25T19:17:54+5:30
सीबीआय दिल्लीत झालेल्या कथित अबकारी निती घोटाळ्याचा तपास करत आहे. २६ फेब्रुवारीला सिसोदियांना अटक करण्यात आली होती.
आपचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कथित दिल्ली दारू घोटाळ्यात सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच सिसोदियांचे नाव आले आहे.
सीबीआय दिल्लीत झालेल्या कथित अबकारी निती घोटाळ्याचा तपास करत आहे. २६ फेब्रुवारीला सिसोदियांना अटक करण्यात आली होती. यानंतर काही दिवसांनी सिसोदियांकडून केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला होता. यापूर्वी दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये सिसोदियांचे नाव नव्हते.
सिसोदिया यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १२०बी, २०१ आणि ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७ए, ८ आणि १३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबतही ईडी सिसोदिया यांची चौकशी करत आहे. सिसोदिया हे उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सिसोदिया यांनी जामीन अर्ज केला असून त्यावर उद्या, २६ एप्रिलला निर्णय होणार आहे. ईडीच्या वकिलांनी जामिनाला विरोध केला. आज झालेल्या सुनावणीत ईडीने या टप्प्यावर जामीन न देण्याची मागणी केली आहे. यामुळे अॅव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय उद्यासाठी राखून ठेवला आहे.