'दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं बोलावलं होतं…’ कानपूर हिंसाचाराच्या तपासात SIT ला मिळाले महत्त्वाचे पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 21:53 IST2022-06-14T21:53:30+5:302022-06-14T21:53:53+5:30
Kanpur Violence: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जफर हाश्मीच्या चौकशीत एसआयटीला महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

'दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं बोलावलं होतं…’ कानपूर हिंसाचाराच्या तपासात SIT ला मिळाले महत्त्वाचे पुरावे
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. या प्रकरणाचा तपास करणार्या एसआयटीला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. ३ जून रोजी कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेला हिंसाचार हा एका कटाचा भाग असल्याचं दिसून येत आहे. या कटात हवालाद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि भाड्याने दगडफेक करणाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं. कानपूर हिंसाचाराचा तपास करणाऱ्या एसआयटीला मुख्य सूत्रधार जफर हाश्मीच्या चौकशीत ही महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
४८ तासांच्या रिमांडदरम्यान, जफर हाशमीनं ३ जून रोजी हिंसाचारासाठी दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं उन्नाव आणि कानपूर येथून बोलावल्याचं कबूल केलं, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यामध्ये उन्नाव येथील शुक्लागंज, कानपूरमधील जाजमऊ बाबू पुरवा आणि कल्याणपूर भागांचा समावेश असल्याचंही सांगण्यात आलं.
जफरच्या बँक खात्यांची चौकशी
एसआयटी जफर हाशमी, त्याची संघटना आणि कुटुंबाशी निगडीत पाच बँक खात्यांची माहिती घेत आहे. दरम्यान, बँक खात्यांऐवजी हवालाद्वारे फंडिंग केली गेल्याचा संशयही एसआयटीला आहे. याशिवाय विद्यार्थी असताना तो सिमीचाही सदस्य होता. तसंच त्या सिमीच्या नेटवर्कमुळे तो पीएफआयच्या काही सदस्यांच्या संपर्कात आल्याचंही एसआयटीच्या समोर आलं आहे.