राम रहीमचा फास अजून आवळला, हनीप्रीतनंतर आता डे-याच्या सीएला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 01:07 PM2017-10-17T13:07:44+5:302017-10-17T13:09:58+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी डे-याचा चार्टर्ड अकाऊंटंट सीपी अरोरा याला अटक करण्यात आली आहे. सीपी अरोरा हा राम रहीमच्या एमएसजी या कंपनीचा सीईओदेखील आहे.
चंदिगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी डे-याचा चार्टर्ड अकाऊंटंट सीपी अरोरा याला अटक करण्यात आली आहे. सीपी अरोरा हा राम रहीमच्या एमएसजी या कंपनीचा सीईओदेखील आहे. हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने कारवाई करत ही अटकेची कारवाई केली. गुरमीत राम रहीमची कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर पोलीस सीपी अरोराचा शोध घेत होते.
राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर हिंसा भडकावण्याचा कट सीपी अरोराने आखला असल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं होतं. घटनेनंतर तो फरार झाला होता, ज्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली होती. सीपी अरोराचं पुर्ण नाव छिंदर पाल अरोरा असं आहे. सीपी अरोरा हा डे-याचा प्रवक्ता आदित्य इन्सा याचा खास मित्र आहे, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत. हिंसाचार झाल्यानंतर हनीप्रीत, सीपी अरोरा आणि आदित्य फरार झाले होते.
SIT #Haryana Police arrest Dera's Chartered Accountant & CEO MSG company CP Arora over alleged involvement in Panchkula violence conspiracy
— ANI (@ANI) October 17, 2017
25 ऑगस्ट रोजी गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हिंसाचार करण्याचा षडयंत्र या तिघांनी मिळून आखलं होतं असं पोलिसांचं म्हणणं आहे.
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.
बाबा राम रहीमने 2002 साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिका-यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिका-यांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. न्या. जगदीप सिंह यांनीही अत्यंत निडरपणे निकाल दिला.