चिन्मयानंद प्रकरणाच्या चौकशीसाठी आता एसआयटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:27 AM2019-09-03T05:27:09+5:302019-09-03T05:27:28+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारला निर्देश; विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने केले आहेत आरोप
नवी दिल्ली / लखनौ : विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर केलेल्या छळाच्या आरोपांचा तपास करण्यासाठी आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत.
न्या. आर. भानुमती आणि ए.एस. बोपन्ना यांच्या पीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना असे सूचित केले की, या प्रकरणात एकमेकांविरुद्ध केलेल्या तक्रारींचा तपास करण्यासाठी एक पीठाची स्थापना करावी. भाजपचे नेते चिन्मयानंद प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीची चौकशी केली. चिन्मयानंद यांच्यावर छळाचे आरोप करून बेपत्ता झालेल्या एका २३ वर्षीय तरुणीसोबत ही व्यक्ती राजस्थानात सापडली होती.विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणाºया या तरुणीने सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपच्या या नेत्यावर असा आरोप केला होता की, त्यांनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले
आहे.
चिन्मयानंद यांना मागितली खंडणी?
भाजप नेते चिन्मयानंद यांनी असा दावा केला आहे की, २२ आॅगस्ट रोजी आपल्याला व्हॉटस्अॅपवरून एक मेसेज आला आणि आपल्याला ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.
विधि महाविद्यालयाचा एक विद्यार्थी गायब होणे आणि चिन्मयानंद यांना ५ कोटी रुपयांची खंडणी मागणे या घटनांचा काही संबंध असू शकतो, असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे, तर चिन्मयानंद यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांचे वकील ओम सिंह यांनी म्हटले आहे.