बुलंदशहरातील हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:29 AM2018-12-05T04:29:11+5:302018-12-05T04:29:34+5:30
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता.
बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली; मात्र मुख्य आरोपी व बजरंग दलाचा कार्यकर्ता योगेश राज हा फरार झाला. न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षकाच्या पत्नीला ४० लाख रुपये, त्याच्या पालकांना १० लाख रुपये भरपाई देण्याचे व त्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी सेवेत सामावून घेण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. बजरंग दलासह आणखी एका संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे; मात्र त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. मृत प्राण्यांचे सापडलेले अवशेष गायीचेच आहेत का, याबद्दल निश्चिती झालेली नाही. २०१५ साली दादरी येथे गोहत्या केल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाक याला मारहाण करून ठार मारण्यात आले होते. त्या प्रकरणाचा तपास सुबोधकुमार सिंह यांच्याकडे होता. त्यामुळेच हिंसाचारात त्यांना ठार मारण्यात आले, असा आरोप सुबोधकुमार यांच्या बहिणीने केला. कुटुंबीयांना भरपाई नको आहे. आदित्यनाथ फक्त गोरक्षणाचा धोशा लावत आहेत, असेही तिने उद्वेगाने सांगितले. (वृत्तसंस्था)
>संघ परिवारच जबाबदार : मंत्र्याचा आरोप
हा हिंसाचार पूर्वनियोजित असून, तो विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रा. स्व. संघ यांनी घडवून आणला, असा आरोप उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील राज्यमंत्री व सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. दरम्यान, मानवाधिकार आयोगाने राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना नोटीस देऊन चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.