सीताराम येचुरींना काँग्रेस राज्यसभेवर पाठविणार?
By admin | Published: April 23, 2017 01:06 AM2017-04-23T01:06:16+5:302017-04-23T01:06:16+5:30
धर्मनिरपेक्षतेसाठीचा संघर्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसने माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
धर्मनिरपेक्षतेसाठीचा संघर्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसने माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. येचुरी यांचा कार्यकाळ १८ आॅगस्ट २०१७ रोजी संपत आहे. तथापि, काँग्रेसच्या या निर्णयामुळे माकपात वादाची शक्यता आहे.
दोनदा राज्यसभेवर पाठविल्यानंतर तिसऱ्यांदा कोणालाही राज्यसभेवर न पाठविण्याची परंपरा नसून, याच परंपरेचे पालन करण्याबाबत केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि माजी सरचिटणीस प्रकाश करात हे आग्रही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, माकपाचे सरचिटणीस संसद सदस्य होऊ शकत नाही. तथापि, येचुरी हे सरचिटणीस झाले, तेव्हा ते राज्यसभेचे सदस्य होते.
काँग्रेसचे पी. भट्टाचार्य यांच्या राज्यसभेतील सदस्यात्वाची मुदत येचुरी यांच्यासोबत संपत आहे. तथापि, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भट्टाचार्य यांना पुन्हा उमेदवारी न देता, माकपचे सीताराम येचुरी यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार राहुल यांनी येचुरी यांची भेट घेऊन काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा शब्द दिला आहे. डाव्या पक्षाच्या अन्य कोणाला उमेदवारी दिल्यास काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नाही.
अशा स्थितीत काँग्रेस
आपला उमदेवार उभा करील, असे स्पष्ट करीत सांप्रदायिक शक्तीविरुद्ध लढण्यासाठी येचुरी हेच हवेत, असे राहुल यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन सर्वांनी येचुरी यांना राज्यसभेवर पाठविण्याचा सल्लाही राहुल यांनी दिला होता.
माकपमध्ये विजयन आणि करात यांचा येचुरींना विरोध असल्याने माकपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल. पश्चिम बंगालमध्ये बैठक होणार आहे. येचुरींनी अनेक प्रदेश शाखांचा
पाठिंबा मिळविला आहे. तेव्हा विजयन आणि करात गटाकडून विरोध होणे अटळ आहे.
राज्य नेतृत्वाला स्पष्ट सूचना
- राहुल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांना बोलावून पश्चिम बंगालमधील सर्व आमदारांचा पाठिंबा येचुरी यांना मिळाला पाहिजे, असे स्पष्ट सांगितले आहे.
- चौधरी यांनीही हा निर्णय काँग्रेसच्या आमदारांना कळविला आहे. विशेष म्हणजे, १८ आॅगस्ट २०१७ रोजी पश्चिम बंगालमधील राज्यसभेचे ७ सदस्य निवृत्त होत आहेत.
- यात बंदोपाध्याय, पी. भट्टाचार्य, डेरेक ओ’ब्रायन, सुखेंदू सेकर, डोला सेन आणि सीताराम येचुरी यांचा समावेश आहे. इतर चार सदस्य तृणमूलचे आहेत.