"मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 10:52 AM2021-05-07T10:52:30+5:302021-05-07T11:03:03+5:30

Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona Situation In India : सीताराम येचुरी यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona situation in india | "मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत"

"मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत"

Next

नवी दिल्ली - देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. आज कोरोनाचे चार लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "तुम्ही काहीच करू शकत नसाल तर खुर्ची रिकामी का नाही करत?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या एका ट्विटमध्ये येचुरी यांनी संसदेची नवीन इमारत बांधण्यासंदर्भातील खर्चाचा देखील उल्लेख केला आहे. "हे बांधकाम थांबवा आणि हा पैसा सर्व भारतीयांना मोफत ऑक्सिजन आणि लसी देण्यासाठी वापरा. ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही मोदींनी आपल्या अहंकारामुळे हे बांधकाम सुरू ठेवलं आहे आणि दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरत आहेत" असं येचुरी यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी येचुरी यांचा पुत्र आशिष येचुरी यांचं कोरोनामुळे निधन झालं. येचुरी यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली होती. 

आशिष येचुरी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सीताराम येचुरी यांनी ट्विटद्वारे आभार मानले होते. येचुरी यांनी आणखी एक ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "तुम्ही ऑक्सिजन पुरवू शकत नाही. तुम्ही लसींचा पुरवठा करू शकत नाही. तुम्ही औषधं आणि रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध करुन देऊ शकत नाही. तुम्ही कोणत्याच पद्धतीची मदत करू शकत नाही. तुम्ही फक्त खोटा प्रचार, कारणं आणि असत्य गोष्टींच पसरवू शकता" असा सणसणीत टोला येचुरी यांनी लगावला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी एका शेर ही लिहिला आहे. "कुर्सी है तुम्हारा जनाज़ा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते" असंही म्हटलं आहे.

कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे रुग्ण, 2 कोटींचा टप्पा केला पार

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी (7 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 4,14,188 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 3,915 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,14,91,598 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,34,083 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 36,45,164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,76,12,351 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Web Title: Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona situation in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.