सीताराम येचुरी यांचा मृतदेह एम्सला दान; कुटुंबीयांचा महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 05:12 PM2024-09-12T17:12:44+5:302024-09-12T17:13:50+5:30
Sitaram Yechury's Death news: श्वासनलिकेतील इन्फेक्शनमुळे त्यांना १९ ऑगस्टला एम्समध्ये भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे आज प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. दिल्ली एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. येचुरी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांचा मृतदेह एम्स हॉस्पिटलला दान केला जाणार आहे.
येचुरी यांचे दुपारी तीन वाजता निधन झाले. श्वासनलिकेतील इन्फेक्शनमुळे त्यांना १९ ऑगस्टला एम्समध्ये भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
एम्सने एक निवेदन जारी करत याची माहिती दिली आहे. येचुरी यांच्या कुटुंबाने मृतदेह अध्यापन आणि संशोधनासाठी एम्स दिल्लीला दान केला असल्याचे यात म्हटले आहे.
सीताराम येचुरी यांचा जन्म १९५२ मध्ये चेन्नई येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता होते. आई कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी होत्या. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमएची डिग्री मिळवली. सीताराम येचुरी १९७५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. १९७५ मध्ये येचुरी जेएनयूमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. कॉलेजमधूनच ते राजकारणात आले. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे ते तीन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून येचुरी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर सीताराम येचुरी यांना २०१५ मध्ये प्रकाश करात यांच्यानंतर सीपीएमचे सरचिटणीस बनवण्यात आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत हरकिशन सिंग सुरजीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती.