सीतेचे माहेर ते सासर बससेवा; पंतप्रधान मोदींनी केला शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:45 AM2018-05-12T03:45:50+5:302018-05-12T03:45:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा नेपाळ दौरा शुक्रवारपासून सुरू झाला असून
काठमांडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा नेपाळ दौरा शुक्रवारपासून सुरू झाला असून, तिथे पोहोचल्यावर मोदी यांनी सीतेचे माहेर असलेल्या जनकपूरहून तिचे सासर असलेल्या अयोध्येला जाण्यासाठी विशेष बससेवेचे उद्घाटन केले.
पंतप्रधान म्हणून मोदी यांचाहा तिसरा नेपाळ दौरा आहे. मधेसींच्या आंदोलनाला भारताचा पाठिंबा असल्याच्या संशयामुळे दोन देशांत तणाव निर्माण झाला होता. मात्र नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांची अलीकडेच झालेली दिल्ली भेट व मोदी यांचा हा दौरा यांमुळे तणाव निवळण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात नेपाळ व चीन यांचे संबंध सुधारत होते. त्यामुळे नेपाळशी संबंध सुधारणे, हा मोदी यांच्या भेटीचा उद्देश आहे.
नेपाळने चीनच्या अब्जावधी रुपयांच्या हायड्रोइलेक्ट्रिकल प्रकल्पाला नकार दिला आहे, तर या भेटीत मोदी व ओली ९00 मेगावॅटच्या अरुण-३ वीज प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पामुळे दोन्ही देशांना वीज मिळेल.
भारत व नेपाळ यांच्यात रामायण
सर्किट तयार करण्याचे आश्वासन
मोदी यांनी जनकपूरमध्ये दिले.
धार्मिक पर्यटनासाठी रामायण
सर्किटद्वारे जनकपूरपासून उत्तर प्रदेशातील अयोध्या, नंदिग्राम,
शृंगवेरपूर, बिहारमधील सीतामढी, बक्सर व दरभंगा, मध्य प्रदेशातील चित्रकूट, पश्चिम बंगालमधील नंदिग्राम, ओडिशातील महेंद्रगिरी, छत्तीसगडमधील जगदलपूर, तेलंगणातील भद्रचलम, तामिळनाडूतील रामेश्वरम, कर्नाटकातील हम्पी तसेच महाराष्ट्रातील नाशिक व नागपूर यांचा विकास केला जाणार आहे.
जानकी
मंदिरात पूजा
सीतेचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनकपूरच्या जानकी मंदिरात मोदी यांनी पूजाही केली, तसेच त्यांनी राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांचीही भेट घेतली.