सर्वसामान्यांचे हाल कायम, पैसे असूनही रुग्ण देत होती मृत्यूशी झुंज
By admin | Published: November 11, 2016 09:59 AM2016-11-11T09:59:44+5:302016-11-11T10:32:01+5:30
केवळ जुन्या नोटा असल्याने एका पक्षाघाताच्या रुग्णाला तातडीने उपचार मिळू शकले नाहीत, नवी दिल्लीतील ही घटना आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा हद्दपार करण्यासाठी मंगळवारी 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ जुन्या नोटा असल्याने एका पक्षाघाताच्या रुग्णाला (Stroke) तातडीने उपचार मिळू शकले नाहीत. चीड आणणारी ही घटना घडली आहे राजधानी नवी दिल्लीमध्ये.
45 वर्षांच्या मुनीश धनकर या विधवा असून त्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील राहणा-या आहेत. बुधवारी त्यांना दोनदा पक्षाघाताचा त्रास झाला, यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी वेळ न घालवता उपचारांसाठी त्यांना घेऊन दिल्लीमध्ये दाखल झाले.
मुनीश यांच्या उपचारांसाठी नातेवाईक आणि मित्रांकडून उधार घेऊन पैशांची जमवाजमव करण्यात आली. मात्र, पैसे असतानाही उपचारांमध्ये समस्या निर्माण होईल, याची फुसटशीही कल्पना मुनीश यांच्या कुटुंबीयांना नाही.
मुनीश यांना रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. दुस-या दिवशी सकाळी त्यांचे यकृत काम करत नसल्याने प्रत्यारोपणासाठी 30 लाख रुपयांचा खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती त्यांचा पुतण्या विपिन कुमारने दिली. आम्ही इतका खर्च करू शकत नसल्याने आम्ही डॉक्टरांकडे डिस्चार्जसाठी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची विनंती केली, असेही कुमारने सांगितले.
मात्र हॉस्पिटल प्रशासनाने डिस्चार्जआधी 1.70 लाख रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. हे बिल भरण्यासाठी आम्ही तयारही होतो, मात्र हॉस्पिटलने जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. चेकची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला तब्बल सहा तास लागले, तोपर्यंत काकी मृत्यूशी झुंज देत होती. हा संघर्ष इथेच संपला नाही तर, आमच्या समोरील समस्या रात्री उशीरापर्यंत कायम होत्या.
रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत, 'लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटल'मधील आयसीयूमध्ये जागा मिळवण्यासाठी आम्हाला बराच संघर्ष करावा लागला. नोटांच्या गोंधळामुळे अशाच प्रकारचा त्रास अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही सहन करावा लागला. रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत असतानाही,संपूर्ण सहकार्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा हॉस्पिटलकडून करण्यात येत आहे.