लडाख सीमारेषेवर स्थिती सामान्य; चीनचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 02:25 AM2020-12-14T02:25:58+5:302020-12-14T02:26:17+5:30
संबंध सुुधारण्यासाठी पावले उचला
नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आता पुन्हा एकदा स्थिती सामान्य झाल्याचा चीनने दावा केला आहे. ही स्थिती भारताने स्वीकारून संबंध सुधारण्यासाठी पावले उचलावीत, अशी चीनची मागणी आहे, तर लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल महिन्यात होती तशीच स्थिती पुन्हा कायम राखावी, असा भारताचा आग्रह आहे.
तशा आशयाची वक्तव्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या महिन्यात केली होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याच्या माघारीसाठी पावले उचलली असून, तिथे शांतता निर्माण झाल्याचा चीनचा दावा आहे. भारत व चीनमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला ७० वर्षे झाली आहेत. हा प्रसंग दोन्ही देशांनी आपापसातील सीमा तंटा व इतर मतभेद बाजूला ठेवून साजरा करायला हवा, असे चीनला वाटते.
भारताने राहावे सावध
अरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधानांसह अन्य भारतीय नेते जे दौरे करतात, त्याला चीनने वेळोवळी आक्षेप घेतले आहेत. हा भूभाग आमचाच असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे. त्यामुळे भारताने अतिशय सावध राहायला हवे, असे भारतीय संरक्षण तज्ज्ञांना वाटते.