सहा आरोपींना राष्ट्रपतींकडून दया नाहीच, फाशीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: July 20, 2014 07:02 PM2014-07-20T19:02:00+5:302014-07-20T19:02:28+5:30
महाराष्ट्रातील पाच मुलांची अत्यंत निर्घूणपणे हत्या करणा-या दोघी बहिणी, निठारी हत्याकांडातील आरोपी यांच्यासह सहा आरोपींचा दया अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावला आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २०- महाराष्ट्रातील पाच मुलांची अत्यंत निर्घूणपणे हत्या करणा-या दोघी बहिणी, निठारी हत्याकांडातील आरोपी यांच्यासह सहा आरोपींचा दया अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे या सर्व आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तबच झाले आहे.
फाशीची शिक्षा झालेल्या सहा आरोपींचा दया अर्ज फेटाळावा असे पत्रक केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना पाठवले होते. यानुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी रविवारी सहा जणांचा अर्ज फेटाळला आहे. यात महाराष्ट्रातील रेणूकाबाई आणि सीमा या दोघी बहिणी, राजेंद्र वासनिक, नोएडातील निठारी हत्याकांडमधील सुरेंद्र कोली, मध्यप्रदेशमधील जगदीश, आसाममधील होलीराम बोरदोलोई यांचा समावेश आहे. या आरोपींचा अर्ज फेटाळला गेल्याने त्यांना फाशीची शिक्षा होणार हे स्पष्ट झाले. आता त्यांना कधी फाशीची शिक्षा दिली जाईल याचा निर्णय स्थानिक राज्य सरकारांच्या हाती असेल.
महाराष्ट्रात १९९० ते १९९६ या कालावधीत रेणुकाबाई, सीमा यांनी त्याच्या आई अंजनाबाई मदतीने १३ मुलांचे अपहरण केले. त्यातील नऊ मुलांची हत्या करण्यात आली होती. कोर्टात पोलिसांना यातील पाच हत्याच सिद्ध करता आल्या. या हत्यांमध्ये त्यांना किरण शिंदे याने मदत केली होती.तो या खटल्यातील माफीचा साक्षीदार होता. कोर्टाने दोघा बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर राजेंद्र वासनिकला २०१२ मध्ये अमरावतीतील आसरा गावातील अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा दिली होती.
नोएडा येथे २००५ ते २००६ येथे मोनिंदर सिंह पंढेर यांच्या बंगल्याच्या आवारात लहान मुलांच्या मृतदेहाचे अवशेष आढळले होते. सुरेंद्र कोली याने मुलांवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणाची उकल झाल्याने अनेक मुलांच्या रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाल्याच्या प्रकरणांचे गूढ उकलले होते. कोलीवर एकूर्ण १६ खटले सुरु आहेत.
मध्यप्रदेशमधील जगदीशला त्याची पत्नी व पाच मुलांच्या हत्येप्रकरणी आणि बोरदोलोईला तिघा जीवंत जाळून त्यांची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती.