देशात सहा टक्के कर्करोगाचे बळी, जगात मिनिटाला १७ व्यक्तींचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 07:30 AM2021-02-04T07:30:31+5:302021-02-04T07:30:43+5:30

Cancer News : जगात प्रत्येक मिनिटाला १७ व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. याखेरीज, जगातील एकूण कर्करोग रुग्णांच्या मृत्यूंत सहा टक्के मृत्यू हे देशातील आहेत.

Six per cent cancer deaths in the country, 17 deaths per minute in the world | देशात सहा टक्के कर्करोगाचे बळी, जगात मिनिटाला १७ व्यक्तींचा मृत्यू 

देशात सहा टक्के कर्करोगाचे बळी, जगात मिनिटाला १७ व्यक्तींचा मृत्यू 

Next

मुंबई : जगात प्रत्येक मिनिटाला १७ व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. याखेरीज, जगातील एकूण कर्करोग रुग्णांच्या मृत्यूंत सहा टक्के मृत्यू हे देशातील आहेत. यापूर्वी, जगात पाचपैकी एक कर्करोग रुग्ण हा देशातील असल्याचे निरीक्षण नोंदविले होते, तर याचे प्रमाण आता चारवर आले आहे. 

यंदा जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने आय एम अँड आय विल हा जनजागृतीपर संदेश देण्यात येणार आहे. या माध्यमातून सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करा, कर्करोगाचा धोका टाळण्याचे आवाहन जागतिक स्तरापासून ते स्थानिक स्तरापर्यंत कऱण्यात येणार आहे. 

कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनुप ताम्हणकर म्हणाले, कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल्या  गोष्टी टाळण्यासाठी  निरोगी जीवनाचा अवलंब केला पाहिजे. संतुलित आहार व वजन नियंत्रणात ठेवून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिले पाहिजे. लठ्ठपणाने आता जगभरातील पौगंडावस्थेतील २० ते ३० टक्के लोकांना प्रभावित केले आहे. लठ्ठपणानंतरच्या आयुष्यात आतड्यांसंबंधी, स्तन, गर्भाशय, स्वादुपिंड, आणि पित्ताशयाचा कर्करोग होण्याच्या जोखमीशी जोडलेला आहे.

स्त्री कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र केरकर म्हणाले, हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही)सारखे विषाणू, जननेंद्रियाची अस्वच्छता, कमी वयातील लैंगिक संबंध, एकापेक्षा अनेक पुरुषांसोबत असलेला लैगिक संबंध, आदी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात. वारंवार होणाऱ्या एचपीव्ही संक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास पुढील १० ते १५ वर्षांत त्याचे रूपांतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगात होते.  चिंताजनक बाब म्हणजे अशा प्रकारचा कर्करोग हा ३५ ते ४५  वयोगटात आढळून येत आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका २.४% वाढला
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण हे वाढत चालले आहे. या कर्करोगाची रुग्णसंख्या पाहता जगातील २० टक्के रुग्ण हे केवळ भारतात आढळून येतात. स्तनांच्या कर्करोगानंतरच्या स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. २०२० मध्ये अशा प्रकारच्या कर्करोगामध्ये दर १०,००,००० महिलांमध्ये २२ नवीन प्रकरणांचे निदान झाले असून गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका २.४ टक्क्यांनी वाढला आहे.

Web Title: Six per cent cancer deaths in the country, 17 deaths per minute in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.