सहा दिवसांच्या भारतीय मुलीची येमेनमधून सुटका
By admin | Published: April 11, 2015 12:47 AM2015-04-11T00:47:29+5:302015-04-11T00:47:29+5:30
येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेल्या विमानात ‘इन्क्युबेटर’मधील सहा दिवसांची मुलगी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती.
कोची : येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेल्या विमानात ‘इन्क्युबेटर’मधील सहा दिवसांची मुलगी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. आजारी असलेल्या या नवजात मुलीस शुक्रवारी मायदेशी आणण्यात आले.
एअर इंडियाचे विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच पार्वती नावाच्या या मुलीला आणि तिच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी या मुलीविषयी टष्ट्वीट करून तिचे छायाचित्रही पोस्ट केले होते. ‘येमेनमधील सर्वात कमी वयाच्या व्यक्तीची सुटका’.
तीन दिवसांची मुलगी एअर इंडियाच्या विमानाद्वारे कोचीला येत असून तिच्या प्रकृतीवर निगराणी ठेवण्यासाठी सोबत एक डॉक्टरही आहे, असे टष्ट्वीट सईद यांनी केले होते. पार्वतीचे आई-वडील राजी आणि शशी यांना गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाने सनाहून दजिबुटी येथे आणण्यात आले.
दजिबुटीतील भारतीय प्रशासनाने डॉ. उमा नांबियार यांना पार्वतीच्या प्रकृतीवर निगराणी ठेवण्यासाठी सोबत पाठवले. अमरान, येमेनमधील रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत असलेल्या राजी यांनी सहा दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. या मुलीची कालच सुटका करण्यात येणार होती. मात्र, तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे ही मोहीम एक दिवस पुढे ढकलण्यात आली, असे नौदलाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.