पंतप्रधान मेमध्ये सहा दिवस परदेशात
By admin | Published: May 5, 2015 11:56 PM2015-05-05T23:56:19+5:302015-05-06T00:42:29+5:30
सत्तेवर आल्यापासून परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चीन दौऱ्याची घोषणा चिनी सोशल मीडिया ‘वायबो’वर केली असून, आपल्या स्टाईलने चिनी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
तीन देशांचा दौरा : १४ ते १९ मेदरम्यान चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाला भेट
बीजिंग : सत्तेवर आल्यापासून परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चीन दौऱ्याची घोषणा चिनी सोशल मीडिया ‘वायबो’वर केली असून, आपल्या स्टाईलने चिनी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी १४ ते १९ मे दरम्यान चीन, मंगोलिया व दक्षिण कोरिया अशा तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा १५ वा परदेश दौरा आहे. गेल्या वर्षी २६ मे रोजी सत्तेवर आल्यापासून मोदी यांनी १५ परदेश दौरे केले असून, ते सुमारे ४० दिवस परदेशात राहिले.
मोदी यांचे देशांतर्गत दौरेही जास्त असून त्यांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. ते १२ वेळा महाराष्ट्रात आले असून, जम्मू-काश्मीरला ८ वेळा गेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा हा वेग पाहता, ते सर्वाधिक दौरे करणारे पंतप्रधान ठरतील, अशी चर्चा आहे.
चीनला मी १४ ते १६ मे अशी तीन दिवसांची भेट देत असून, या भेटीत दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील, असे अपेक्षित आहे, असे मोदी यांनी वायबोवर जाहीर केले आहे. मोदी यांची भेट चीनमध्ये प्रथमच अधिकृतपणे जाहीर झाली आहे.
मोदी यांचा चीन दौरा चीनचे प्राचीन शहर शियानपासून सुरू होईल. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व त्यांची पत्नी पेंग लियुन त्यांचे स्वागत करतील.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे गेल्यावर्षी अहमदाबाद शहरात जसे स्वागत झाले तसेच स्वागत मोदी यांचे केले जाईल. शियान ही शांक्सी प्रांताची राजधानी असून अध्यक्ष जिनपिंग यांचे घर या शहरात आहे. चीनचे अध्यक्ष बीजिंगखेरीज दुसऱ्या शहरात परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्याची ही दुर्मिळ वेळ आहे. दरम्यान, चीन दौऱ्यानंतर १८ मे रोजी मोदी दक्षिण कोरियाला जाणार आहेत. (वृत्तसंस्था)
भारतीय नागरिकांसाठी कार्यक्रम
>भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधान मोदी १४ ते १६ मे द रम्यान चीन दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते शियान, बीजिंग व शांघाय शहरांना भेट देणार असून, सांस्कृतिक व व्यावसायिक कार्यक्रमात सहभागी होतील, असे या निवेदनात म्हटले आहे.
> चीनमधील भारतीय नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार असून, अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर, सिडनीतील आॅलिम्पिक पार्क व कॅनडातील टोरोंटो येथील रिकोह कोलीसियम येथील सभांची पुनरावृत्ती चीनमध्ये होईल असे अपेक्षित आहे.