चीनमधून आलेल्या ६४५ भारतीयांना नाही ‘कोरोना’ची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 08:17 PM2020-02-19T20:17:58+5:302020-02-19T20:24:33+5:30
या ६४५ जणांमध्ये ३६ जण महाराष्ट्रीयन
पुणे: कोरोना ग्रस्त चीनमधील वुहान प्रातांतून दिल्लीत आणलेल्या ६४५ भारतीय कोरोना आजाराच्या तपासणीत निगेटिव्ह (आजार नसलेले) आढळले आहेत. कोरोनाची बाधा नसल्याने त्यांना आपापल्या राज्यात परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र पुढील १४ दिवस सावध राहण्याच्या व तपासणी करून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
या ६४५ जणांमध्ये ३६ जण महाराष्ट्रीयन आहेत. कोरोनासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मुंबईत सुरू केलेल्या राज्य नियंत्रण कक्षातून ही माहिती देण्यात आली. फेब्रुवारीच्या सुरूवातीला या ६४५ प्रवाशांना वुहानमधून विमानाने भारतात आणण्यात आले होते. बुधवारपर्यंत (दि. १९ फेब्रुवारी) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४१ हजार २०८ प्रवासी तपासण्यात आले. चीनमधील बाधीत भागातून राज्यात आतापर्यंत २६६ प्रवासी आले आहेत. यापैकी कोणालाही कोरोनाची बाधा नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे तपासणी कक्षातील ६९ जणांना घरी पाठवण्यात आले असून २ जण अद्याप मुंबईतील तपासणी कक्षात आहेत.
कोरोना विषाणू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी तसेच त्याच्या नियंत्रणाची पुर्वतयारी म्हणून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अशा ३९ कक्षामध्ये एकूण ३६१ रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता आहे. केंद्र सरकारने वुहान शहरातून येणाºया सर्वच प्रवाशांना तपासणी कक्षात दाखल करून घेऊन त्यांची रक्त तपासणी करण्याचे आदेश राज्य आरोग्य विभागाला दिले आहेत.