‘इसिस’साठी ६ भारतीय ठार

By admin | Published: November 24, 2015 03:15 AM2015-11-24T03:15:27+5:302015-11-24T03:15:27+5:30

पॅरिसपासून बांगलादेशपर्यंत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करून जगभर कमालीच्या तिरस्काराचा विषय बनलेल्या ‘इस्लामिक स्टेट’साठी सीरिया आणि इराकमध्ये लढताना भारतातून गेलेल्या

Six Indians killed for ISIS | ‘इसिस’साठी ६ भारतीय ठार

‘इसिस’साठी ६ भारतीय ठार

Next

गुप्तहेरांची माहिती : कल्याणच्या टंकीचाही मृतांमध्ये समावेश; २३ भारतीय बनले ‘जिहादी’
नवी दिल्ली : पॅरिसपासून बांगलादेशपर्यंत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करून जगभर कमालीच्या तिरस्काराचा विषय बनलेल्या ‘इस्लामिक स्टेट’साठी सीरिया आणि इराकमध्ये लढताना भारतातून गेलेल्या सहा ‘जिहादीं’चा मृत्यू झाल्याची माहिती पाश्चात्त्य गुप्तहेर संघटनांकडून मिळाली आहे.
या माहितीनुसार, आत्तापर्यंत एकूण २३ भारतीय ‘इसिस’मध्ये सामील झाले असून, त्यांच्या विखारी प्रचाराला बळी पडून ‘जिहादी’ होण्यासाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या आणखी १७ जणांना गेल्या काही महिन्यांत देशाच्या विविध भागांत गुप्तहेर संघटनांनी वेळीच रोखले आहे.
पाश्चात्त्य गुप्तहेर संघटनांनी भारतीय अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, पुढील सहा भारतीय ‘इसिस’साठी लढताना ठार झाले आहेत- अतिफ वसीम मोहम्मद (आदिलाबाद, तेलंगण), मोहम्मद उमर सुभान (बंगळुरू, कर्नाटक), मौलाना अब्दुल कादिर सुलतान आरमार (भटकळ, कर्नाटक), शाहीम फरूख टंकी (कल्याण, महाराष्ट्र), फैज मसूद (बंगळुरू, कर्नाटक) आणि मोहम्मद साजिद उर्फ बडा साजिद (आझमगढ, उत्तर प्रदेश). याखेरीज ‘इस्लामिक स्टेट’विषयी सहानुभूती असणाऱ्यांनी टिष्ट्वटरवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या जुलैमध्ये ‘इसिस’साठी लढताना दोन भारतीय सीरियात ठार झाले आहेत. हे दोघे वरील सहापैकी आहेत की आणखी वेगळे आहेत, हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अविश्वास आणि दुय्यम वागणूक
गुप्तहेर संघटनांच्या माहितीनुसार, भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांसह दक्षिण आशियाई देशांतून तसेच नायजेरिया व सुदान यांसारख्या आफ्रिकी देशांतून आलेल्यांना ‘इसिस’ कट्टर मुसलमान मानत नाही. त्यामुळे अरब वंशाच्या ‘जिहादीं’हून त्यांना हलके मानून दुय्यम वागणूक दिली जाते. पगार, निवासस्थाने, शस्त्रे व दारूगोळा आणि पद व हुद्दे अशा सर्वच बाबतींत दक्षिण आशियाई व आफ्रिकन ‘जिहादीं’ना अरब ‘योद्ध्यां’च्या तुलनेत सापत्न वागणूक दिली जाते.दक्षिण आशिया व आफ्रिकी देशांतून आलेले ‘जिहादी’ कुरआन व हादिथच्या शिकवणुकीनुसार कट्टर ‘इस्लाम’चे पालन करीत नसल्याने कोणतीही जबाबदारी देण्यापूर्वी त्यांचे ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते व सलाफी जिहादचे भूत त्यांच्या डोक्यात ठासून भरले जाते; शिवाय पळपुटेपणा करून या लोकांनी स्वदेशी परत जाऊ नये यासाठी इराक / सीरियात आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पासपोर्ट जाळून टाकले जातात.
मृत्यूच्या दाढेत ढकलले जाते
गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार, भारत व इतर दक्षिण आशियाई देशांतून जाणाऱ्यांची संख्या अरब देशांतून आलेल्यांहून कितीतरी कमी असली तरी मरण पावणाऱ्यांमध्ये अरब ‘जिहादीं’ची संख्या तुलनेने कमी दिसते. याचे कारण असे की प्रत्यक्ष ‘युद्ध’भूमीवर या ‘दुय्यम मुस्लिमां’ना आघाडीची फळी म्हणून मृत्यूच्या दाढेत आधी ढकलले जाते व अधिक सुसज्ज शस्त्रसामग्री असलेले अरब ‘योद्धे’ दुसरी फळी सांभाळतात.

शिवाय आशियाई व आफ्रिकी ‘सैनिकां’ना बऱ्याच वेळा फसवून ‘शहीद’ केले जाते, अशीही माहिती मिळते. म्हणजे असे की, या लोकांना स्फोटकांनी भरलेले वाहन देऊन ठरावीक ठिकाणी जायला व तेथे गेल्यावर ठरावीक नंबरवर फोन करण्यास सांगितले जाते. प्रत्यक्षात तो नंबर फिरविला की आधीपासून केलेल्या व्यवस्थेने स्फोटकांचा स्फोट होऊन या ‘जिहादीं’सह ठरलेले लक्ष्य उद््ध्वस्त होते.

Web Title: Six Indians killed for ISIS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.