‘जेएमबी’च्या सहा हस्तकांना अटक
By admin | Published: September 27, 2016 01:40 AM2016-09-27T01:40:25+5:302016-09-27T01:40:25+5:30
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेच्या ६ प्रमुख हस्तकांना अटक करण्यात आली असून, त्यात तीन बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.
कोलकाता : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेच्या ६ प्रमुख हस्तकांना अटक करण्यात आली असून, त्यात तीन बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.
सहायक पोलीस आयुक्त विशाल गर्ग यांनी सांगितले की, यातील
चौघे २०१४ च्या खगरागड बॉम्बस्फोटप्रकरणी हवे होते. खगरागड प्रकरणानंतर त्यांनी राज्यातून पलायन करून दक्षिण भारत आणि ईशान्येकडील राज्यांत मुक्काम हलविला होता.
दक्षिणेकडील काही राज्यांत घातपाती कारवाया घडवून आणण्याचे त्यांचे षड्यंत्र होते. आम्ही या कटाचा तपशील मिळवीत आहोत.
कोलकाता पोलीस दलाच्या विशेष कृती दलाने अटक केलेल्यांत जेएमबीच्या पश्चिम बंगाल शाखेचा प्रमुख अन्वर हुसैन फारुक आणि युसूफ शेख यांचा समावेश आहे. युसूफ पश्चिम बंगाल शाखेचा उपप्रमुख असून, एनआयएने त्यांना पडकून देण्यासाठी १० लाखांचे बक्षीस ठेवले होते.
पोलिसांनी शाहिदुल इस्लाम, मोहंमद रुबेल, अब्दुल कलाम व जदिदुल इस्लाम यांना पकडले असून, ते २ आॅक्टोबर २०१४ रोजी खगरागड येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हवे होते. कलाम आणि रुबेल यांची माहिती देणाऱ्यास अनुक्रमे ३ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
असे घेतले ताब्यात
युसूफ आणि शाहिदुल यांना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नातून बाजार भागात पकडण्यात आले, तर फारुक आणि रुबेल यांच्या याच जिल्ह्यातील बंगाओ भागात मुसक्या आवळण्यात आल्या. कलामला उत्तर बंगालमधील कुचबिहार स्टेशन येथे, तर जाहिदुल याला आसामच्या कच्छर जिल्ह्यात अटक करण्यात आली