पश्चिम बंगालमध्ये ‘बुलबुल’ चक्रीवादळाच्या तडाख्यात १० मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 06:08 AM2019-11-11T06:08:54+5:302019-11-11T06:09:28+5:30
चक्रीवादळ ‘बुलबुल’ने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये धडक दिली
कोलकाता : चक्रीवादळ ‘बुलबुल’ने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये धडक दिली असून, रविवारी सकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शहराच्या अनेक भागांत आणि किनाºयालगतच्या जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोलकाता आणि उत्तर परगना जिल्ह्यात शनिवारी पावसाशी संबंधित दुर्घटनात १० जणांचा मृत्यू झाला असून, राज्यातील २ लाख ७३ हजार नागरिकांना या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मासेमारीकरिता गेलेले ८ मच्छीमार बेपत्ता आहेत. राज्याच्या उत्तर परगना जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनात पाच जणांचा मृत्यू झाला. पूर्व मिदनापूर जिल्ह्यातही वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री जावेद खान यांनी सांगितले की, २४७३ घरे उद््ध्वस्त झाली आहेत. २६ हजार घरांची पडझड झाली आहे. राज्यात ९ ठिकाणी १.७८ लाख लोकांना शिबिरात ठेवण्यात आले आहे. चक्रीवादळ बुलबुलमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढील आठवड्यातील आपला उत्तर बंगालचा दौरा रद्द केला आहे. त्या सोमवारी नामखाना आणि बक्खाली परिसरात हवाई पाहणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मोदी यांनी टष्ट्वीट केले आहे की, चक्रीवादळची स्थिती आणि पूर्व भारतात अनेक भागात जोरदार पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची समीक्षा केली.
पोलिसांनी सांगितले की, शहरात देवदार वृक्षाची फांदी तुटून त्याखाली सापडून एक क्लबच्या कर्मचाºयाचा मृत्यू झाला. बशीरहाट, उत्तर २४ परगनामध्ये वेगवेगळ्या घटनात तीन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी दिवसभर शहरात मुसळधार पाऊस झाला.
दक्षिण व उत्तर २४ परगना जिल्ह्यात आणि पूर्व मिदनापूरमध्ये १३५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहत होते. शनिवारी मध्यरात्री चक्रीवादळ धडकले. शहरात शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक भागातील रस्ते बंद झाले. कोलकाता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रस्त्यांवरील झाडे हटविण्यास सुरुवात केली.
>बांगलादेशात २१ लाख लोकांचे स्थलांतर
ढाका : बांगलादेशात आलेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळाने दोन जणांचा मृत्यू झाला असून, सखल भागात राहणाºया २१ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली असून, पिकेही नष्ट झाली आहेत. चक्रीवादळामुळे १२० किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत.