गुप्त माहिती पाकिस्तानला देणाऱ्या २ जवानांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 05:36 AM2019-11-07T05:36:30+5:302019-11-07T05:37:00+5:30
सोशल मीडियाचा वापर : महिला हस्तकाने ओढले प्रेमाच्या जाळ्यात
जयपूर : पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेच्या एका महिला हस्तकाला व्हॉटस्अॅप आणि फेसबुक या समाजमाध्यमांच्या मार्गे गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून भारतीय लष्करातील दोन जवानांना जोधपूर रेल्वेस्थानकात अटक करण्यात आली.
पाकिस्तानमध्ये असलेल्या महिला ‘आयएसआय’ एजंटने गोपनीय माहिती मिळविण्यासाठी या दोन जवानांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे प्राथमिक तपासावरून दिसते, असे राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितले. मंगळवारी रात्री जोधपूर येथे अटक केल्यानंतर या दोन्ही जवानांना अधिक तपासासाठी जयपूरला आणले गेले.
हे दोन्ही जवान पोखरण येथे नियुक्तीवर होते. संशयावरून त्यांच्यावर आधीपासून पाळत ठेवण्यात आली होती. सुटीत गावी जाण्यासाठी जोधपूर रेल्वे स्टेशनवर आले असता ‘इंटेलिजन्स ब्युरो’(आयबी) व स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांनी अटक केलेल्या या जवानांची नावे लान्स नायक रवी वर्मा व शिपाई विचित्र बोहरा अशी दिली. यातील वर्मा मूळचा मध्यप्रदेशातील, तर बोहरा आसामचा आहे.
पंजाबी ढंगात संभाषण
च्‘आयएसआय’ची ही महिला एजंट ‘व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’ (व्हीओआयपी) या सेवेचा वापर करून या दोघांना पाकिस्तानमधून फोन करीत असे; पण तिचा तो नंबर भारतामधीलच असल्याचे वाटत असे. च्या जोडीला तिच्या पंजाबी ढंगाच्या बोलण्यावरून ती भारतीय असल्याचा समज होऊन हे जवान तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले.