यूपीत दहावी परीक्षेला ६ लाख विद्यार्थ्यांचा रामराम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:35 AM2018-02-10T00:35:15+5:302018-02-10T00:35:22+5:30
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत. धक्कादायक अशा या गोष्टीबद्दल चिंता वाटण्याऐवजी उत्तर प्रदेश सरकारने त्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. परीक्षेत कॉपी व इतर गैरप्रकार करणा-यांना सरकारने चाप लावल्यामुळेच हे घडल्याचा दावा उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण खात्याचे दिनेश शर्मा यांनी सांगितले.
परीक्षेकडे पाठ फिरविरणा-यांपैकी ८० टक्के विद्यार्थी हे उत्तर प्रदेशमधील नाहीत. ज्या शाळेत ते कधी गेलेच नाहीत, अशा शाळांंमध्ये नोंदणी करून हे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसत असत. विद्यार्थी फक्त परीक्षेच्या वेळीत दिसत. ओस पडलेल्या शाळा जिथे काहीही शिकविले जात नाही, अशा शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेस बसण्यास बंदी घालण्यात आली. असे विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी अनेक गैरप्रकार करीत. एवढेच नव्हे, तर त्यांच्याऐवजी भलत्यांनाच परीक्षेला बसवले जात असे. त्यात पैशाची मोठी उलाढालही होते. या अपप्रवृत्तींना सरकारने यंदा चाप लावला आहे असे उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळानेही म्हटले आहे. परीक्षेत पहिल्या तीन पेपरना ६,३३,२१७ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. परीक्षा पूर्ण होईपर्यंत हा आकडा वाढून साडेसात लाखाच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.