सहा महिन्यात कुलभूषण जाधव यांच्या फाशीचा निर्णय
By admin | Published: May 1, 2017 10:53 AM2017-05-01T10:53:12+5:302017-05-01T10:53:12+5:30
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीसंबंधी पाकिस्तान पुढील सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्याची शक्यता आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 1 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीसंबंधी पाकिस्तान पुढील सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊने यासंबंधी वृत्त दिलं असून सहा महिन्यांमध्ये फाशी देण्यासंबंधी निर्णय होऊ शकतो. काही दिवसांपुर्वी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी मुलाखतीदरम्यान कुलभूषण जाधव प्रकरणी आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायदा नाही तर आपल्या कायद्यानुसार काम करणार आहोत असं सांगितलं होतं.
कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यामागचं कारण विचारलं असता, "त्यांना गतवर्षी 3 मार्चला अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर हेरेगिरी आणि पाकिस्तानला नुकसान पोहोचवण्याच्या आरोपाखाली खटला चालला आणि त्यानंतरच शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा काही प्रश्न नाही. अशा प्रकरणांमध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे".
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असून भारताने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सर्व द्विपक्षीय चर्चांवर तात्पुरती स्थगिती आणली आहे.
कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवत पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांचा बचाव करण्यासाठी भारताकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र जाधव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने नकार दिला आहे. जाधव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं आतापर्यंत 13 वेळा प्रयत्न केले आहेत. मात्र पाकिस्तानच्या उद्दाम भूमिकेमुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधल यांच्यावर हेरगिरीचा आरोप करत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. यावर पाकिस्तानानं सुनावलेली शिक्षा म्हणजे पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचे खडेबोलही भारताने पाकला सुनावले आहेत.
दरम्यान, "कायदेशीर बाबीनुसार जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप असल्यानं आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारची मदत पुरवली जाऊ शकत नाही. पुराव्यांद्वारे जाधव पाकिस्तानविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे दिसले. यामुळे त्यांना शिक्षा देणे हे पाक लष्कराची जबाबदारी आहे. या प्रकरणात आम्ही कोणतीही तडजोड न करता जाधव यांना शिक्षा सुनावली आहे", असे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली.
"ट्रायलदरम्यान जाधव यांच्यासंबंधी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली. या निर्णयाविरोधात जाधव सुप्रीम कोर्टात आपली याचिका दाखल करू शकतात. मात्र प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानी लष्कर त्याचा विरोधच करणार", असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत याला मान्यता मिळू शकते, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.