पहलू खानने नाव घेतलेले सहाही हल्लेखोर ‘निर्दोष’, इनामही रद्द, राजस्थानमधील गोरक्षक हल्ला प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:01 AM2017-09-15T01:01:15+5:302017-09-15T01:01:28+5:30
राजस्थानात अलवर येथे गेल्या १ एप्रिल रोजी स्वयंभू गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीने मृत्यू झालेल्या पहलू खान या दूध व्यावसायिकाने मृत्यूपूर्व जबानीत ज्या सहा जणांचा हल्लेखोर म्हणून नावानिशी उल्लेख केला होता त्या सर्वांना रपोलिसांनी तपासाअंती ‘क्लीन चीट’ दिली आहे.
जयपूर : राजस्थानात अलवर येथे गेल्या १ एप्रिल रोजी स्वयंभू गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीने मृत्यू झालेल्या पहलू खान या दूध व्यावसायिकाने मृत्यूपूर्व जबानीत ज्या सहा जणांचा हल्लेखोर म्हणून नावानिशी उल्लेख केला होता त्या सर्वांना रपोलिसांनी तपासाअंती ‘क्लीन चीट’ दिली आहे.
पहलू खान राजस्थानमध्ये जनावरे खरेदी करून ती हरियाणात घेऊन जात असताना त्यांचे वाहन अडवून गोरक्षकांनी हा हल्ला केला होता. जबर जखमी झालेल्या पहलू खानने दोन दिवसांनंतर मृत्यू होण्यापूर्वी दिलेल्या जबानीत हुकूम चंद, नवीन शर्मा, जगमल यादव, ओमप्रकाश, सुधीर आणि राहुल या सहा हल्लेखोरांचा नावानिशी उल्लेख केला होता. राजस्थान पोलिसांनी यांच्याविषयी माहिती देणाºयास प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षिसही जाहीर केले होते.
अलवारजे जिल्हा पोलीस अधीक्षक राहुल प्रकाश यांनी सांगितले की, पहलू खानने मृत्यूपूर्व जबानीत नावे घेतलेल्या या सहाजणांविरुद्ध सीआयडीने केलेल्या तपासात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने त्यांना पकडण्यासाठी जाहीर केलेले इनामही मागे घेण्यात आले आहे.
जुलैमध्ये तपास स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग केला गेला होता. संबंधितांचे जाबजबाब आणि संशयितांच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड यासह इतर तपास केल्यानंतर या सहाजणांविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची नावे आरोपींमधून वगळली जावीत, असे सीआयडीने अलवर पोलिसांना कळविले आहे.
या सहाजणांखेरीज पोलिसांनी इतर सात आरोपींना अटक केली असून त्यापैकी पाच आरोपींना जामीन मिळाला आहे. (वृत्तसंस्था)
हा तर विश्वासघात
हा चक्क विश्वासघात आहे. आम्ही फेरतपासाची मागणी करू. हल्ला झाला तेव्हा मीही वडिलांसोबत होतो. हल्लेखोर एकमेकांना ज्या नावांनी हाका मारत होते त्यात या सहाजणांची नावे होती. - इर्शाद, मयत पहलू खानचा मुलगा