अरुणाचलमधील सहा भागांचे चीनने केले नव्याने नामकरण
By admin | Published: April 20, 2017 12:52 AM2017-04-20T00:52:07+5:302017-04-20T00:52:13+5:30
दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशमधील सहा भागांवर दावा
बीजिंग : दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशमधील सहा भागांवर दावा करीत, तेथील सहा ठिकाणांचे चिनी भाषेत नामकरण केलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांना चीनने अधिकृतरीत्या नावे दिल्याचे वृत्त चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे.
चीनने पहिल्यांदाच ही कृती केली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार हा भाग दक्षिण तिबेट असून, त्यावर आमचाच ताबा आहे. चिनी सरकारच्या नियमांनुसार दक्षिण तिबेट (अरुणाचल प्रदेश)च्या सहा ठिकाणांच्या नावांना चिनी, तिबेट व रोमन वर्णांनुसार मानकीकृत केले आहे. या सहा ठिकाणांचे वोग्यानग्लिंग, मिला री, क्वीडेंगार्बो री, मेन्क्युका, बुमो ला आणि नामकापुब री असे रोमन वर्णांनुसार नामकरण केले आहे.
भारत ज्या भूभागाला अरुणाचल प्रदेश असे संबोधतो, त्या प्रत्यक्षात आमच्या आणि दक्षिण तिबेटचा भाग असलेल्या सहा ठिकाणांना चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रोमन भाषेतील वणार्नुसार नावे दिली आहेत, असे वृत्त ग्लोबल टाइम्सने दिले आहे. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यामुळे दोन देशांमधील सीमा प्रश्नावरील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे चीनने म्हटलं आहे. त्यातच अरुणाचल प्रदेशमधील सहा परिसरांचे नामकरण करून, त्यावर आपलाच हक्क असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न नव्याने सुरू केला आहे.
भारत व चीनमध्ये ३ हजार ४८८ किलोमीटरवरील प्रत्यक्ष सीमारेषेवरून वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशला चीनकडून कायमच दक्षिण तिबेट संबोधले जाते. भारतासोबत झालेल्या १९६२ सालच्या युद्धात चीन त्यातील काही क्षेत्रावर ताबा मिळवला होता. तो सध्या अक्साई चीन म्हणून ओळखला जातो.
तवांग दिल्यास अक्साई चीन मिळेल?
काही दिवसांपूर्वी चीनने अरुणाचल प्रदेशमधील तवांग हा दोन्ही देशांच्या सीमेवरील भाग आपणास देण्यात यावा, अशी मागणी केली होती. पूर्वेकडील भागात भारताने चीनच्या हितांचे रक्षण केल्यास त्या बदल्यात चीनही त्याबदल्यात इतर भूभाग (अक्साई चीन) देण्याचा विचार करेल, असे चीनकडून सांगण्यात आले होते. भारतात असलेल्या तवांग जिल्हा व शहरापासून चीनची सीमा ३७ कि.मीटर अंतरावर आहे. तो परिसर बम ला पास नावानेही ओळखला जातो.