खड्ड्यांमुळे भारतात दिवसाला सहा जण गमावतात आपला जीव, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 11:10 AM2017-10-28T11:10:53+5:302017-10-28T11:13:53+5:30
भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.
नवी दिल्ली - भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. अपघातांच्या या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून खड्ड्यांमुळे वर्षभरात 714 जणांचा मृत्यू झाला असून, यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे 329 जणांनी जीव गमावला आहे. 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत.
विशेष म्हणजे सर्वात जास्त वाहनसंख्या असणा-या दिल्लीत खड्ड्यांमुळे एकही अपघात झाला नसल्याची नोंद आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीवरुन, पोलीस कशाप्रकारे अपघाताच्या ख-या कारणाचा शोध न घेता, तपास दुस-या दिशेला वळवतात हे स्पष्ट झालं आहे. प्रवाशांकडून वारंवार रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार केली जात असतानाही गतवर्षी वाहतूक मंत्रालयाने अपघाताची आकडेवारी जाहीर करताना खड्ड्यांमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही आकडेवारी जाहीर करण्यात आली होती.
एका पोलीस अधिका-याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, 'रस्त्यांची मालकी असणा-या एजन्सीवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी चर्चा असते, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचं प्रमाण फार कमी आहे. अपघातासाठी चालकाला किंवा रस्त्याच्या दुरावस्थेलाच जबाबदार ठरवलं जातं. अनेकदा पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचतात, आणि जखमींचा रुग्णालयात मृत्यू होतो'.
गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्याची हौस जिवावर, फक्ता एका वर्षात 2100 जणांचा मृत्यू
वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार गतवर्षी गाडी चालवत असताना मोबाइलचा वापर केल्याने जवळपास 2138 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, रस्ते दुर्घटनांमध्ये होणा-या सर्वात जास्त मृत्यूमागचं मुख्य कारण मोबाइलचा वापर आहे. वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर हरियाणाचा क्रमांक आहे. राजधानी दिल्लीत गतवर्षी दोन जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील आकडा मोठा आहे. महाराष्ट्रात एकूण 172 जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पहिल्यांदाच वाहतूक मंत्रालयाने राज्यांकडून ही माहिती गोळा केली आहे.
अहवालानुसार, देशात प्रत्येक तासाला रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू होतो. वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलचा वापर यामागे मुख्य कारण आहे. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्यांवरुन चालणारे लोकही चालताना मोबाइलचा वापर केल्याने अपघाताला बळी पडले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, 'वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने, अपघात होण्याची शक्यता चौपटीने वाढते'. 'सेव्ह लाइफ फाऊंडेशन'ने देखील यासंबंधी एक सर्व्हे केला होता. सर्व्हेमध्ये वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण होते असं समोर आलं होतं. सर्व्हेत सहभागी झालेल्या 47 टक्के लोकांनी गाडी चालवताना मोबाइलवर फोन आल्यास आपण उत्तर देतो असं मान्य केलं होतं.