नरेंद्र जाधवांसह सहा राज्यसभेवर

By admin | Published: April 23, 2016 04:29 AM2016-04-23T04:29:29+5:302016-04-23T04:29:29+5:30

प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, आॅलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी

Six Rajya Sabha members including Narendra Jadhav | नरेंद्र जाधवांसह सहा राज्यसभेवर

नरेंद्र जाधवांसह सहा राज्यसभेवर

Next

नवी दिल्ली : प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, आॅलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त १० पैकी सात सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी सहा जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. सातव्या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू असून त्या जागेसाठी स्पर्धा आहे.
सात सदस्यांच्या निवृत्तीनंतर तिथे कोणाच्या नियुक्ती होणार, यावर गेले काही दिवस दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आले होते. इंडिया टीव्हीचे रजत शर्मा, झी टीव्हीचे सुभाषचंद्र आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र पक्षामध्ये एकमत न झाल्यामुळे सातव्या जागेवर नियुक्ती करण्यात आलेली नाही.
सुब्रमण्यम स्वामी व डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता. डॉ. जाधव हे अर्थतज्ज्ञ असून, ते नियोजन आयोगावर होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार समितीवरही होते. त्यांच्यामार्फत दलित समाजाला पक्षाजवळ आणण्याची भाजपाची इच्छा आहे. स्वपन दासगुप्ता यांच्या नियुक्तीसाठी अर्थमंत्री अरुण
जेटली प्रयत्नशील होते. लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीच प्रयत्न केला.
ईशान्येकडील सात राज्यांत तसेच केरळमध्ये येत्या काळात पाय रोवण्याचे भाजपा जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यादृष्टीने पावले पडायला सुरुवात झाली असून, मेरी कोम आणि मल्याळम अभिनेते सुरेश गोपी यांची नियुक्ती त्याचाच भाग आहे. राष्ट्रपती नियुक्त १0 सदस्यांपैकी दोन खासदार गेल्या नोव्हेंबरमध्ये, तर पाच सदस्य २ एप्रिल रोजी निवृत्त झाले. उरलेले तिघे सदस्य २0१८ साली निवृत्त होत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Six Rajya Sabha members including Narendra Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.