काश्मीरमध्ये घुसणारे सहा दहशतवादी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:41 AM2018-06-11T06:41:34+5:302018-06-11T06:41:34+5:30
प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलाने रविवारी पहाटे हाणून पाडला.
श्रीनगर - प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलाने रविवारी पहाटे हाणून पाडला. या वेळी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. ही घटना काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातल्या केरान क्षेत्रामध्ये घडली.
यासंदर्भात कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, पाकिस्तानातून दहशतवाद्यांचा एक गट सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता. सुरक्षा जवानांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कारवाई केली. सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये काही तास चकमक सुरू होती. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांपैैकी कोणी भारतीय हद्दीत प्रवेश केला नाही ना, याचा छडा लावण्यास केरान क्षेत्रातील जंगलभागामध्ये सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली होती. घुसखोरीच्या प्रयत्नात अनेक दहशतवादी आहेत. मात्र, तंगधर येथे मारल्या गेलेल्या पाच घुसखोर दहशतवाद्यांपैैकी दोघे हे काश्मीरमधील पुलवामा व कुलगाम येथील रहिवासी होते.
एकतर्फी शस्त्रसंधीनंतर चार घटना
रमझानच्या काळात केंद्र सरकारने काश्मीरमध्ये एकतर्फी शस्त्रसंधीची घोषणा १६ मे रोजी केली. त्यानंतर भारतीय हद्दीत दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याच्या चार घटना घडल्या आहेत. हे प्रयत्न सुरक्षा जवानांनी हाणून पाडले असून, त्या वेळी झालेल्या चकमकीत एकूण १७ दहशतवादी ठार झाले आहेत. कुपवाडा जिल्ह्यातील मचिल भागामध्ये घुसखोरी करणाऱ्या
तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.
२६ मे रोजी तंगधर
येथे अशाच एका घटनेत झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले. १८ मे रोजी हंडवारा येथे तीन घुसखोर दहशतवादी सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत मरण पावले होते.