आसाममध्ये गेलेले तृणमूलचे नेते परतले माघारी, विमानतळावरच काढली रात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:42 PM2018-08-03T16:42:40+5:302018-08-03T16:44:21+5:30
तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.
सिल्चर- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन तृणमूल काँग्रेसने गेले तीन दिवस अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर थेट आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणं सुरु केलं तर त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांनी आसामची वाट धरली. मात्र सिल्चरमध्ये विमानतळावर या शिष्टमंडळाला अडवण्यात आले व रात्रभर तेथेच रोखून धरण्यात आलं होतं.
#LokSabha disrupted after protests by #TMC MPs over the detention of their leaders at #Silchar airport: https://t.co/Up7z5nW23R#TMCAirportAssaultpic.twitter.com/VUHpyiUOYS
— IANS Tweets (@ians_india) August 3, 2018
तृणमूल काँग्रेस पक्षाचे सहा नेते आज सकाळी आसाममधून पश्चिम बंगालला जायला निघाले आणि दोन नेते दुपारी दिल्लीला गेले. खासदार अर्पिता घोष आणि ममता बाल ठाकुरिया आसासममधून दिल्लीला गेल्या. एनआरसीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर आसासममधील बंगालीबहुल सिल्चरमधील परिस्थिती काय आहे हे पाहाण्यासाठी तृणमूलचे आठ सदस्य तेथे गेले होते. मात्र त्यांना विमानतळावरच रोखून धरण्यात आले. सिल्चरमध्ये प्रवेश करण्यास मनाई केल्यामुळे त्यांना विमानतळावरच बसून राहावे लागले. अखेर हे सदस्य माघारी फिरले.
या शिष्टमंडळातील सदस्य आणि खासदार शेखर रे यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला तसेच शिष्टमंडळातील महिलांशी गैरवर्तन केले असेही ते म्हणाले. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी शेखर रे यांच्या म्हणण्याला दुजोरा देत तसाच आरोप केला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार तृणमूलच्या सदस्यांनीच गैरवर्तनाला सुरुवात केली आणि पोलिसांना जखमी केले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबद्दल केंद्र सरकार व आसाम सरकारवर टीका करत हा सगळा राजकीय बदला घेण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. आसाम सरकार केंद्रसरकारप्रमाणे असं का वागत आहे, भाजपा शक्तीचा वापर करत आहे असा आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी आपल्या जुन्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत यू टर्न घेतला असला तरी तृणमूलमध्ये मात्र धुसफूस सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.