बापरे! पेन्सिलनं घेतला ६ वर्षीय मुलीचा जीव; कारण ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 04:12 PM2022-12-22T16:12:21+5:302022-12-22T16:12:32+5:30
होमवर्क करण्यासाठी गेलेली आर्टिका तोंडात कटर ठेऊन पेन्सिल सोलत होती. पेन्सिलची साल तिच्या तोंडात गेली आणि ती श्वसननलिकेत अडकली
हमीरपूर - उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षीय विद्यार्थिनीचा पेन्सिलची साल घशात अडकल्याने तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, साल घशात अडकल्यामुळे मुलीला गुदमरून जीव गमवावा लागला.
विद्यार्थिनी तोंडात कटर घेऊन पेन्सिल सोलत होती. पेन्सिलची साल घशात अडकल्याने तिचा श्वास थांबला, नातेवाईकांनी तिला सीएचसीमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोतवाली परिसरातील पहाडी वीर गावात राहणारे नंदकिशोर यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी त्यांचा मुलगा अभिषेक (१२) आणि मुली अंशिका (८) आणि आर्टिका (६) टेरेसवर अभ्यास करत होते.
होमवर्क करण्यासाठी गेलेली आर्टिका तोंडात कटर ठेऊन पेन्सिल सोलत होती. पेन्सिलची साल तिच्या तोंडात गेली आणि ती श्वसननलिकेत अडकली. यानंतर ती निष्पाप मुलगी जमिनीवर अचानक खाली कोसळली. मृत तरुणी गावातील प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होती. मुलीच्या मृत्यूनंतर आई अनिता हिची रडून प्रकृती बिघडली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यास असे अपघात टाळता येतील असं या घटनेबाबत सीएचसीचे डॉक्टर सत्येंद्रकुमार यादव यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मुलांना झोपून अन्न खाण्यापासून किंवा पाणी पिण्यापासून देखील प्रतिबंधित केले पाहिजे कारण अन्न श्वसननलिकेत अडकल्याने मृत्यू होऊ शकतो. सामान्यतः मुलांना कोणतीही गोष्ट उचलून तोंडात घालण्याची सवय असते, अशा परिस्थितीत पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं.