सहा वर्षे पूर्ण असतील; तेव्हाच मिळेल पहिलीत प्रवेश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:27 AM2024-02-27T10:27:50+5:302024-02-27T10:29:34+5:30
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी किमान वय ६ वर्षे करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाने सांगितले की, सर्व शाळांनी प्रवेशाच्या वेळी मुलांचे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशाचे वय किमान ६ वर्षे असल्याची खात्री करावी. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी किमान वय प्रत्येक राज्यांत वेगवेगळे आहे.
येथे ६ वर्षांअगोदर घेतले जाते शाळेत
नवीन शैक्षणिक धोरणात शासनाने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेताना मुलाचे वय ६ वर्षे ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचे पालन केले जात नाही.
आसाम, गुजरात, पुद्दुचेरी, तेलंगणा, लडाख, आंध्र, दिल्ली, गोवा, राजस्थान, उत्तराखंड, हरयाणा, केरळ, झारखंड, कर्नाटक या राज्यांमध्ये ६ वर्षांखालील मुलांना पहिलीत प्रवेश दिला जात आहे.