सहावीत शिकणा-या मुलीने दिला बाळाला जन्म !
By admin | Published: February 9, 2015 03:31 PM2015-02-09T15:31:29+5:302015-02-09T15:31:29+5:30
ओडिशातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहावीत शिकणा-या एका मुलीने बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
ऑनलाइन लोकमत
कोरापूट, दि. ९ - ओडिशातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहावीत शिकणा-या एका मुलीने बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. सहावीत शिकणारी अवघ्या १२-१३ वर्षाची मुलगी कुमारी माता बनल्याने वस्तीगृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जेपोर भागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र सेनापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल वसतीगृहाचे मुख्याध्यापक कैलाश वर्मा आणि वस्तीगृहाचे अधीक्षक साबीता गुरु यांना अटक करण्यात आली आहे. मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला कळविली नाही. ही मुलगी उमरी आश्रम शाळेत शिकते. अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून हे वसतीगृह चालविण्यात येते. या मुलीने ४ फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. वसतीगृह प्रशासनाने या मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर तिला तिच्या घरी नेऊन सोडले. ही मुलगी अप्परकेंडी गावची रहिवासी असून याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात अशी प्रकारची घटना घडण्याची ही दुसरी वेळ असून कंधमाल जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिला होता.