शिक्षिकांना निवडणूक कामातून वगळा !
By admin | Published: September 26, 2014 12:13 AM2014-09-26T00:13:12+5:302014-09-26T00:13:12+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच महापालिका शाळांमधील ५० वर्षांवरील शिक्षिकांना प्रिसायडिंग आॅफिसर-१ चे काम दिले गेल्याने या शिक्षिकांमध्ये नाराजी पसरली आहे
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच महापालिका शाळांमधील ५० वर्षांवरील शिक्षिकांना प्रिसायडिंग आॅफिसर-१ चे काम दिले गेल्याने या शिक्षिकांमध्ये नाराजी पसरली आहे. यासंदर्भात ठामपा प्राथमिक शिक्षक सेनेने निवडणूक विभागाला निवेदनाद्वारे या कामातून शिक्षिकांना वगळण्याची मागणी केली आहे.
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत महापालिका शाळांमधील ९० टक्के शिक्षकांना काम दिले गेले आहे. त्यामुळे महापालिका शाळा ओस पडल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ५० वर्षांहून अधिक वयोगटाच्या शिक्षकांनाही बीएलओसह विविध स्वरूपाची जोखमीची कामे दिली गेली आहेत. यामध्ये शिक्षिकांचाही समावेश आहे. दरम्यान प्रिसायडिंग आॅफिसर-१ चे काम शिक्षिकांना दिले गेले असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता ठामपा प्राथमिक शिक्षक सेनेच्या वतीने निवडणूक विभागाला एक निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे शिक्षिकांना या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. परंतु, त्यांना अपेक्षित असे उत्तर न दिल्याने आता नाइलाजास्तव शिक्षिकांना प्रिसायडिंग आॅफिसरचे काम करावे लागणार आहे. याबाबत निवडणूक यंत्रणा कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
(प्रतिनिधी)