मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:36 AM2021-08-13T06:36:05+5:302021-08-13T06:38:22+5:30
केंद्राची सूचना; आंतरराज्य प्रवास सुलभ हवा
नवी दिल्ली : देशात ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा पर्यटक, प्रवाशांना आंतरराज्य प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी करण्याची तसेच त्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची सक्ती करू नये अशी सूचना केंद्रीय पर्यटन विभागाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांना काही राज्यांमध्ये जाताना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागत नाही. मात्र मुंबई, पुणे, चेन्नई येथून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांना अद्यापही आरटी-पीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.
कर्नाटक, गोवा, छत्तीसगढ या राज्यांतही अशीच बंधने आहेत. केंद्रीय पर्यटन खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांसाठी सर्व राज्यांनी एकाच प्रकारची नियमावली अंमलात आणावी. आंतरराज्य प्रवास करणाऱ्या पर्यटकांना कोरोना काळात विविध राज्यांतील वेगवेगळ्या नियमांमुळे जो त्रास सहन करावा लागतो, त्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना पुन्हा आरटी-पीसीआर करायला न लावता महाराष्ट्र, सिक्कीम ही राज्ये आपल्या हद्दीत प्रवेश देत आहेत.
समान नियम लागू करा
कोरोना काळात देशातील सर्व राज्यांनी प्रवेशाबाबतचे समान नियम तयार केले तर पर्यटकांना, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही असे केंद्र सरकारला वाटते. त्या अनुषंगाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र लिहिले आहे. तसेच सर्व राज्यांसाठी समान नियम तयार करण्यासाठी केंद्रीय पर्यटन खाते, नागरी हवाई वाहतूक खाते यांची एक संयुक्त बैठक लवकरच होणार आहे.